कापसावर होणारे रोग, कीड व त्याचे व्यवस्थापन (भाग – २)

shetshivar 2

पहिल्या भागात दिलेल्या विविध कीडरोगांसोबत कापसावर अन्य काही कीडरोगांचाही प्रादुर्भाव होतो. जसे की, अमेरिकन बोंडअळी, शेंदरी बोंडअळी, ठिपक्याची बोंडअळी, पाने पोखरणारी अळी, तांबडे ढेकूण, करडे ढेकूण, लाल कोळी आदी किडरोगांचा उल्लेख करता येईल. हवामान व भुक्षेत्रानुसार याचा प्रादुर्भाव व नियंत्रण वेगवेगळे असते.

अमेरिकन बोंडअळी : ही बहुभक्षी कीड असून विविध पिकांचे मोठ्या माणात नुकसान करते. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर अळी सुरुवातीस कोवळी पाने, कळ्या, पाती, फुले यांवर उपजीविका करते. बोंडे आल्यानंतर त्यामध्ये तोंड खुपसून आतील भाग खाते. त्यामुळे लहान बोंडे, पात्या, फुले, कळ्या गळून पडतात किंवा झाडावरच पावसाच्या पाण्यामुळे सडतात. सततचे पावसाळी वातावरण, ७५ टक्यांपेक्षा जास्त हवेतील आर्द्रता, कमी सूर्यप्रकाश या बाबी या किडीच्या प्रादुर्भावास पोषक आहेत.

शेंदरी बोंडअळी : उष्ण व ढगाळ हवामानात थोडा पाऊस आल्यास शेंदरी बोंडअळीची वाढ झपाट्याने होते. शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून बोंडामध्ये आढळून येतो. अळी कळ्या, फुले किंवा बोंडे यांना बारीक छिद्र करून आत शिरते. प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. किडलेली पाती, बोंडे गळून पडतात किंवा परिपक्‍व न होताच फुटतात. अळ्या बोंडामध्ये आत शिरल्यानंतर वरून तिचा प्रादुर्भाव लक्षात येत नाही. अळी बियांना छिद्र करून सरकी खाते. त्यामुळे रुईची प्रत खराब होते आणि सरकीतील तेलाचे प्रमाण कमी होते.

ठिपक्याची बोंडअळी : या किडीची अळी प्रथम झाडाच्या शेंड्यात शिरून आतील भाग खाते. त्यामुळे शेंडे सुकून जातात. पीक फुलावर येताच अळी कळ्यांत शिरून व नंतर बोंडात शिरून त्याचे नुकसान करते. कीड लागलेल्या कळ्या व बोंडे गळून पडतात. झाडावर राहिलेली बोंडे लवकर फुटतात व त्यापासून कमी प्रतीचा कापूस मिळतो.

पाने पोखरणारी अळी : ज्या शेतामध्ये वेलवर्गीय भाजीपाला घेतल्यानंतर कपाशीची लागवड केली जाते, अशा ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो. या किडीची अळी पानाच्या आत शिरून हिरवा भाग खाते. त्यामुळे पानावर नागमोडी आकाराच्या रेषा दिसतात.

तांबडे ढेकूण : ही कीड वर्षभर कार्यक्षम असते; पण सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अधिक कार्यरत असते. प्रौढ ढेकूण व पिले सुरुवातीला पानातून, कोवळ्या शेंड्यातून रस शोषतात. पक्‍व बोंड आणि उमललेल्या बोंडावर बहुसंख्येने राहून सरकीतील रस शोषतात.

करडे ढेकूण : ही कीड नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत कार्यक्षम असते. प्रौढ व पिले अर्धवट उमललेल्या बोंडातील, सरकीतील रस शोषून घेतात. त्यामुळे तेलाचे प्रमाण कमी होते व बियाण्याची प्रत घसरते. यंत्रामधून सरकी काढताना हे ढेकूण चिरडून रुईवर डाग पडतात.

लाल कोळी : लाल कोळी कीटकांपेक्षा वेगळे असतात. त्यांना आठ पाय असतात. पिले व प्रौढ कोळी कोवळ्या पानातील रस शोषतात. त्यामुळे पानावर फिकट पांढरट पिवळे चट्टे पडतात. नंतर पाने तपकिरी होऊन वाळतात. सध्या लाल कोळ्याचा प्रादुर्भाव काही ठिकाणी आढळून येत आहे.

एकात्मिक कीड व्यवस्थापन कसे करावे?
बीटी कपाशीवरील किडींच्या व्यवस्थापनासाठी केवळ रासायनिक कीटकनाशकांचाच वापर न करता मशागतीय, यांत्रिक, जैविक पद्धतींचा वापर करावा. गरज पडल्यास आर्थिक नुकसानीच्या पातळीनुसार रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी. पेरणी करतेवेळी बीजप्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते. बियाण्यास इमिडाक्‍लोप्रीड किंवा थायामिथॉक्झाक (७०डब्ल्यूएस) ५-७ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. त्यामुळे सुरुवातीला १५ ते २० दिवस रस शोषणार्‍या किडींपासून संरक्षण मिळेल.

पेरणीपासून ४० दिवसांनी संभाव्य प्रमुख किडी : मावा, तुडतुडे, पिठ्या ढेकूण रस शोषण करणार्‍या किडींसाठी अ‍ॅसिफेट (७५%) २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अ‍ॅसिफेट हे मध्यम विषारी गटातील असल्यामुळे मित्रकिडींना कमी हानिकारक आहे. किंवा फोरेट (१० जी) किंवा फिप्रोनील (०.३ जी दाणेदार) १० किलो
प्रतिहेक्टर या प्रमाणात जमिनीत ओल असताना झाडाच्या भोवती बांगडी पद्धतीने द्यावे. पहिली फवारणी जेवढी लांबवता येईल, तेवढी लांबवावी. त्यामुळे मित्र कीटकांचे संवर्धन होईल. निओनिकोटिनॉइड गटातील कीटकनाशके, विशेषकरून इमिडाक्‍लोप्रीडचा वापर करू नये. तसेच मित्र कीटकांना हानिकारक कीटकनाशकांची फवारणी टाळावी.

पिकाच्या ४०-६० दिवसांमधील संभाव्य प्रमुख किडी : तुडतुडे, फुलकिडे, पिठ्या ढेकूण व्हर्टिसीलियम लिकॅनी या बुरशीची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा थायामिथॉक्झाक (२५ %) २.५ ग्रॅम किंवा असिटामिप्रीड (२० %) २ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
सुरुवातीच्या काळात करडे भुंगेरे, पाने पोखरणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, उंटअळ्या, केसाळ अळ्या इत्यादी दुय्यम किडी कमी प्रमाणात आढळून येतात. त्यांच्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करू नये.

पिकाच्या ६०-८० दिवसांमधील संभाव्य प्रमुख किडी : फुलकिडे, तुडतुडे, पांढरी माशी फिप्रोनील (५ %) २० मि.लि. किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन (५ %) ८ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. शेतात पिवळे चिकट सापळे लावावेत.

पिकाच्या ८०-१०० दिवसांमधील संभाव्य प्रमुख किडी : फुलकिडे, पांढरी माशी, तुडतुडे, पिठ्या ढेकूण, अमेरिकन बोंडअळी ५ % निंबोळी अर्क किंवा निंबोळी तेल ५० मि.लि. किंवा अझाडिरॅक्टीन (३००० पीपीएक) २५ मिलि किंवा अझाडिरॅक्टीन (१०,००० पीपीएक) १० मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे किंवा रस शोषण करणार्‍या किडींसाठी बुप्रोफेझीन (२५ %) १० मि.लि. किंवा डायफेनथ्युरॉन (५० %) १२ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.

१०० दिवसांनंतर संभाव्य प्रमुख किडी : पांढरी माशी, तुडतुडे, पिठ्या ढेकूण, अमेरिकन व शेंदरी बोंडअळी रस शोषण करणार्‍या किडींसाठी अ‍ॅसिफेट (५० %) किंवा इमिडाक्‍लोप्रीड (१.८ %) हेक्टरी १० ग्रॅम किंवा ट्रायझोफॉस (४० %) ३० मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

(फवारणी करतेवेळी शेतकर्‍यांनी स्थानिक तज्ञ, कृषी अधिकारी व जाणकारांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण पिकांची परिस्थिती, हवामान व वेळेनुसार यात बदल होवू शकतात.)

Exit mobile version