शेतकरी आंदोलनात कांद्यासह कलिंगड, द्राक्ष मोफत वाटले; कारण कळाल्यास तुम्हालाही वाटेल शेतकर्‍यांचा अभिमान

farmer andolan

शिर्डी : शेतकर्‍यांनी पुणतांबा ग्रामपंचायतीसमोर ५ दिवसीय धरणे आंदोलनाला सुरवात केली आहे. आंदोलनाच्या दुसर्‍याच दिवशी शेतकर्‍यांनी कांद्यासह कलिंगड, द्राक्ष ही फळे आंदोलनाच्या ठिकाणी मोफत वाटप करुन सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आंदोलनाच्या दुसर्‍या दिवसापासून पंचक्रोशीतील शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी येण्यास सुरवात झाली आहे. यामुळे शेतकरी आंदोलनाची व्याप्ती वाढतांना दिसत आहे.

आंदोलनापूर्वीच राज्यभरातील शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांचे निवेदन शेतकर्‍यांनी राज्य सरकारला दिले होते. शिवाय त्यावर निर्णय घेण्यासाठी आठ दिवसाची मुदतही देण्यात आली होती. असे असताना राज्य सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे १ जूनपासून नगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात शेतकर्‍यांनी धरणे आंदोलनाला सुरवात केली आहे.

आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलकांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर दुसर्‍या दिवशी सरकारच्या निर्णयाचा आणि धोरणाचा निषेध करण्यासाठी एक वेगळाच प्रयोग आंदोलनाच्या ठिकाणी केला आहे. ज्या शेतीमालाला कवडीमोल दर मिळत आहे अशा सर्वच फळे आणि भाजीपाला हा फुकटात वाटप करण्यात आले.

राज्यात ५ जूनपर्यंत साखर कारखाने हे सुरु राहणार आहेत. असे असताना सबंध राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम आहे. पुणतांबा येथील आंदोलनामध्ये ऊसाच्या गाळपासून ते साखरेच्या उत्पादनपर्यंत विषय घेण्यात आले आहेत. राज्यात विशेषत: मराठवाड्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. त्यामुळे शिल्लक ऊस उत्पादकांना अनुदान द्यावे, उर्वरीत ऊसाचे वेळेत गाळप करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

Exit mobile version