बकर्‍यांची बँक ही संकल्पना तुम्हाला माहित आहे का? महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यात सुरु होणार गोट बँक

goat

नागपूर : बँक म्हटले की, डोळ्यासमोर येतात एसबीआय, बँक ऑफ महाराष्ट्र, एचडीएफसी सारख्या बँका जेथे आपण आपले पैसे जमा करु शकतो, आपल्या खात्यातून पैसे काढू शकतो किंवा कर्जासाठी अर्ज करु शकतो. मात्र गोट बँक ही संकल्पना थोडीशी वेगळी आहे. नावावरुन याचा अर्थ बकर्‍यांची बँक असा होतो. आज आपण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

नागपूर जिल्ह्यातील ५०० महिलांना सहभागी करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी महामंडळाच्या प्रक्षेत्र बोंद्री येथे गोट बँकेची स्थापना करण्यात येणार आहे. या अंतर्गत महामंडळाच्या निधीतून ५०० महिलांना शेळ्यांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी दिली.

मंत्रालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या आढावा बैठक नुकतिच पार पडली. या बैठकीत ना. केदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्रावरचे बळकटीकरण व आधुनिकीकरण करण्यासाठी ९४ कोटी प्रस्तावित करण्यात आले आहे. यामध्ये पशूधन खरेदी करणे, नवीन वाडे बांधकाम, कृत्रिम रेतन कार्यक्रम राबवणे, मुरघास निर्मिती यंत्रसामुग्री, शेळी मेंढी पालन प्रशिक्षण केंद्र इमारत बांधकाम, प्रशिक्षणार्थी निवासी इमारत बांधकाम व शेतकरी निवासस्थान, जमीन विकास, सिंचन सुविधा विहीर, पाईपलाईन, इलेक्ट्रीक मोटर, ट्रॅक्टर ट्रॉली, कृषी अवजारे व चारा कापणी यंत्र, वैरण साठवणूक गोडाऊन, शेळी-मेंढी खाद्य कारखाना, कार्यालय इमारत बांधकाम, अधिकारी कर्मचारी निवास बांधकाम, प्रक्षेत्रावरील आवश्यक साधनसामुग्री, सुरक्षा भिंत, सिल्वी -पाश्चर विकसित करणे, अंतर्गत रस्ते, अल्ट्रासोनोग्राफी युनिट, फिरते शेळी-मेंढी चिकित्सालय वाहन खरेदी, फाँडर ब्लॉक मेकिंग युनिट, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Exit mobile version