ट्रॅक्टर लिलावातून जिल्हा बँकेची ५५ लाखाची वसुली

district bank recovered rs 55 lakh from tractor auction

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या धडक थकबाकी वसुली मोहिमेंतर्गत सटाणा येथे जप्त केलेल्या २१ ट्रॅक्टरचा जाहीर लिलाव करण्यात येऊन त्यापोटी बँकेने ५५ लाख, ८२ हजार रुपये वसूल केले आहेत. जिल्हा बँकेने यापूर्वी खातेदारांना वाहनकर्ज वाटप केले; परंतु त्याचा भरणा केला नसल्याने अशी थकबाकीदार वाहने जप्त करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. बँकेने आत्तापर्यंत जिल्ह्यातील एकूण २३८ वाहने, ट्रॅक्टर जप्त केलेले आहेत. त्यानुसार मंगळवारी सटाणा तालुक्यातील जप्त केलेल्या २३ ट्रॅक्टरचा इंजमाने, नामपूर येथे जाहीर लिलाव ठेवला होता. त्यात एका थकबाकीदाराने पैसे भरल्याने त्याचा ट्रॅक्टर सोडून देण्यात आला; तर उर्वरित २२ ट्रॅक्टरची लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात २१ ट्रॅक्टरचा लिलाव झाला असून, बँकेस ५५ लाख ८२ हजार रुपये मिळाले आहेत.
जिल्हा बँकेने थकीत कर्जवसुलीकरिता धडक मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यातील सन २०१५-१६ पूर्वीचे मोठे व प्रभावशाली असलेले, तसेच हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणाजया थकबाकीदारांचे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १९६१ चे नियम १०१ नुसार कारवाई सुरू केली आहे. यात मोठे व प्रभावशाली असलेले, तसेच हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणाजया थकबाकीदारांवर कर्ज वसुलीसाठी कार्यवाही सुरू करण्याचे आदेश बँक प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार धडक वसुली मोहीम राबवित बँकेची वाहन / ट्रॅक्टर कर्जाची मोठी थकबाकी झालेली असून, त्यापैकी आतापर्यंत जिल्ह्यातील २३८ वाहने, टॅलक्टर्स जप्त केलेली आहेत.

सदर सभासद हे सन २००१ ते २०१२ ह्या कालावधीतील थकबाकीदार आहेत. बँकेने वारंवार कर्जमागणी नोटिसा देऊनही व सौजन्याने तगादे करूनही त्यांनी थकीत कर्ज रकमेचा बँकेकडे भरणा केला नसल्यामुळे सदरची कारवाई करण्यात आली. वसुलीसाठी धडक मोहिम हाती घेत बँकेने उर्वरित लिलाव दि.८, ९, ११ आणि १५ फेब्रुवारी रोजी देवळा, चांदवड, सटाणा व मालेगाव तालुक्यात होणार आहेत. जिल्ह्यातील थकबाकीदार सभासदांनी कटू कायदेशीर कारवाई टाळून आपला थकबाकीचा भरणा लवकरात लवकर करून बँकेस सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Exit mobile version