भाजी मंडईत शेतमालाचे भाव कसे ठरतात, तुम्हाला माहित आहे का? शेअर बाजारासारखेच असते गणित

India will be the largest agricultural market in Asia

प्रतीकात्मक फोटो

मुंबई : कृषी प्रधान म्हणून ओळखल्या जाणार्‍या आपल्या देशात शेतकर्‍यांची अवस्था अत्यंत वाईट होत चालली आहे. प्रत्येक हंगामात त्यांचे नुकसान ठरलेलेच असते, कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे तर कधी सरकारी धोरण, आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थिती, दलाल, व्यापारी आदी मानवनिर्मित संकटांमुळे! शेतकर्‍यांना या संकटातून बाहेर काढायचे असले तर सर्वात चांगला मार्ग म्हणजे, पिकांना योग्य हमीभाव. मात्र पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आपला शेतमाल रस्त्यावरच फेकून देतात. याबाबत बातमी वाचण्यात आल्यानंतर अनेकांना प्रश्‍न पडतो, की कमी भाव मिळाला म्हणून काय झाले फेकण्यापेक्षा माल विकला तर काही पैसे तर पदरी पडले असते? असा प्रश्‍न तुम्हालाही पडला असेल तर भाजी मंडई कशी चालते व शेतमालाचे भाव कसे ठरतात? हे तुम्हाला समजून घ्यावे लागेल.

कधी कमी पावसामुळे, तर कधी अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी होते. सर्व काही सुरळीत झाले आणि शेतात भरपूर उत्पादन झाले तर बाजारात चांगला दर मिळत नाही. यामुळे भाजी मंडई कशी चालते याचे गणित आज आपण समजून घेवूयात. जर तुम्हाला शेअर बाजारा विषयक माहिती असेल तर तसेच काहीसे गणित येथेही असते. बाजारात आल्यानंतर शेतकरी प्रथम अनेक एजंटांना भेटतात, जे भाजीपाला विकण्याचे काम करतात. हे एजंट शेअर बाजारातील दलालांसारखेच असतात, ज्यांच्या मदतीने शेअर्सची खरेदी किंवा विक्री केली जाते. या एजंटांशिवाय भाजीपाला विकता येत नाही, त्यांच्या मदतीने या भाज्यांचा लिलाव केला जातो.

शेअर बाजारात शेअरची मागणी अधिक वाढली तर त्याची किंमतही वेगाने वाढू लागते. त्याचप्रमाणे भाजी मार्केटमध्ये मागणी वाढली की भाव वाढतात आणि कमी झाले की कमी होतात. भाजी मार्केटमध्ये एजंट किंमत ठरवून त्यावर बोली लावू लागतात. मागणी जास्त असेल तर बोली सतत वाढते, पण मागणी कमी असेल तर बोली झपाट्याने कमी होते. ग्राहकाला मिळेल त्या किमतीत माल विकला जातो. यामुळेच बाजारातील कोणत्याही भाजीपाला किंवा फळाचा दर आधीच सांगता येत नाही.

शेअर मार्केटमधील इनसाईडर ट्रेडिंगसारखे प्रकार देखील भाजी मंडईत होतात. इनसाइडर ट्रेडिंग म्हणजे, जेव्हा काही लोक संगनमताने शेअर्स खरेदी आणि विक्री करतात आणि त्यांच्या किंमती चुकीच्या पद्धतीने वाढवतात किंवा कमी करतात, तेव्हा त्याला इनसाइडर ट्रेडिंग म्हणतात. हे भाजी मंडईतही घडते, ज्यामध्ये एजंट आणि व्यापारी एकत्र किंवा कधी कधी व्यापारी एकत्र इनसायडर ट्रेडिंग करतात. सर्वजण मिळून शेतकर्‍यांचा माल कमी बोलीवर विकण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर त्यावर जोरदार नफा मिळवतात. अनेक व्यापारी बोली लागण्यापूर्वीच शेतकर्‍याला त्याच्या पिकाची काही किंमत देतात. ज्या किंमतीत शेतमाल विकला जातो. ती पूर्ण रक्कम शेतकर्‍याला मिळत नाही. सर्व प्रथम, शेतकर्‍याला बाजार कर भरावा लागेल, नंतर एजंटचे कमिशन, माल उतरवून नेणे आवश्यक असल्यास, हमाली, हे सर्व कापल्यानंतर जे पैसे शिल्लक राहतील, ते शेतकर्‍याला मिळतात.

Exit mobile version