शास्त्रशुध्द ठिबक सिंचनाने घ्या केळीचे भरघोस उत्पन्न

banana-farming-drip-irrigation

अ) जोड ओळ पद्धत

केळी पिकास ठिबक सिंचन लावायचे असल्यास लागवड पद्धतीत बदल करणे फायद्याचे आहे. जोडओळ पद्धतीमध्ये शेतामध्ये ९० सें.मी. अंतरावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने सर्‍या पाडाव्यात. त्यानंतर दोन सर्‍यांमध्ये केळीची रोपे १.५ मी. अंतरावर लावावीत व त्या दोन सर्‍यामधील वरंबा सपाट करून व लगतच्या सर्‍यांना भर देऊन गादी वाफा तयार करावा. त्यानंतर दोन ओळीमध्ये उपनळ्या टाकून त्यावर १.५ मी. अंतरावर तोट्या बसवाव्यात. अशाप्रकारे दोन ओळींसाठी फक्त एकच उपनळी व दोन समोरासमोरील रोपांसाठी एकच तोटी वापरून उपनळ्या व तोट्यांच्या खर्चात निम्याने बचत करता येते. वरीलप्रमाणे दोन सर्‍यात केळीची लागवड केल्यानंतर पुन्हा दोन सर्‍या रिकाम्या सोडाव्यात व नंतर लगतच्या सर्‍यामध्ये पुन्हा केळीची लागवड करावी. अशाप्रकारे दोन उपनळ्यांमध्ये ३.६ मी. तर दोन जोडओळीतील २.७ मी. इतके अंतर राहते. या पद्धतीचे वैशिष्ट्ये म्हणजे दोन ओळींमध्ये ट्रॅक्टर किंवा बैल वापरून आंतरमशागत करता येऊन खर्चातही बचत करता येते.

ब) सलग लागवड पद्धत

नेहमीच्या पद्धतीने (१.५÷१.५ मी.) केळीची लागवड केली असता प्रत्येक ओळीसाठी एक उपनळी व प्रत्येक झाडासाठी एक तोटी द्यावी लागत असल्यामुळे ठिबक सिंचन संच बसविण्यासाठी सुरुवातीचा जोड ओळ पद्धतीपेक्षा १५-२० हजार रुपये जास्त खर्च करावा लागतो. परंतु नेहमीच्या पद्धतीत प्रति हेक्टरी ७ ते ८ टन उत्पादन जास्त मिळते व ठिबक पद्धतीसाठी करावा लागणारा अतिरिक्त खर्च भरून निघतो. म्हणून या नेहमीच्या १.५÷१.५ मी. अंतरावरील लागवड पद्धतीची ठिबकखालील केळीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे.

केळीसाठी सुध्दा ठिबक सिंचन संचातुन विद्राव्य खतांच्या मात्रा दिल्या असता ३९ टक्यांपर्यंत उत्पादनामध्ये वाढ व २० टक्के खतांची बचत झाल्याचे आढळुन आलेले आहे. केळीचे अधिक उत्पादन आणि पाण्याच्या व खतांच्या कार्यक्षम वापरासाठी शिफारशीत खत मात्रेच्या (२००:४०:२०० नत्र स्फूरद पालाश ग्रॅम/झाड) ८० टक्के खते विद्राव्य स्वरुपात १८ हप्त्यात पंधरवड्याच्या अंतराने तक्ता क्र. ५ प्रमाणे दिल्याने ३९ टक्यांपर्यंत उत्पादनामध्ये वाढ व २० टक्के खतांची बचत झाल्याचे आढळुन आलेले आहे.

(साभार : कृषिदर्शनी, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी)

Exit mobile version