नाशिक : रब्बी हंगामात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हिवाळ्यात वाटाण्याच्या लागवडीसाठी योग्य ठरते. योग्य व्यवस्थापन केले गेले आणि उत्तम निगा राखली गेली तर ही वाटाणा लागवड शेतकरी बांधवांना भरघोस उत्पन्न देते. महाराष्ट्रात वाटाण्याच्या पुढील जातींची शिफारस केली आहे : बोनव्हीला, खापरखेडा, अर्ली बॅजर, एनपी २९, वाई वाटाणा, सिलेक्शन ८२ व सिलेक्शन ९३. सद्यस्थितीत लागवडीसाठी लवकर येणार्या जातींची निवड करावी. उदा.असौजी, निटीऔर, अर्लीबॅजर, बोनव्हिला, आर्केल, जवाहर- १, फुले प्रिया या जातींची निवड करावी.
वाटाण्याची लागवड ही सपाट जमिनीत करतात किंवा सरी पद्धतीने करतात त्यासाठी दीड ते दोन फूट अंतरावर सरी करून दोन्ही अंगास बिया टोचून लागवड केली जाते. दोन बियातील अंतर पाच ते सात सें.मी. ठेवावे. वाटाणा लागवड करताना सरी-वरंबे किंवा सपाट वाफ्यामध्ये ३० द्ब १५ सें.मी. अंतरावर करावी. टोकण पद्धतीने लागवड करण्यासाठी ३० ते ४० किलो प्रति एकर आणि पेरणी पद्धतीसाठी ५० ते ६० किलो प्रति एकरी बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास सॉईल पॉवर १ मि.ली. सोबत ट्रायकोडर्मा ५ मि.ली. किंवा कार्बेन्डॅझीम ३ ते ४ ग्रॅम किंवा थायरम ३ ग्रॅमची बीजप्रक्रिया करावी.
रासायनिक खते : वाटाणा पिकास जमिनीचा पोत पाहून खत वापरले जाते, त्यासाठी साधारण हेक्टरी १५ ते २० टन शेणखत, २० ते ३० किलो नत्र, ५० ते ६० किलो स्फुरद आणि ५० ते ६० किलो पालाश जमिनीचा पोत पाहून द्यावा. जमिनीची मशागत करत असताना शेणखत योग्य प्रकारे मिसळून द्यावे. त्याचबरोबर संपूर्ण पालाश आणि स्फुरद व अर्धे नत्र, बी पेरण्याचे अगोदर जमिनीत पेरावे किंवा मिसळावे. त्यातून राहिलेले नत्र ज्या वेळी पीक फुलावर येईल त्या वेळी फ्लॉवरबूस्ट सोबत द्यावे.
कीड व रोगांचे व्यवस्थापन : वाढत्या थंडीच्या काळात पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव होण्यास वातावरण अनुकूल असते. वाटाण्याच्या पिकावर मावा आणि शेंगेतील अळी या कीटकांचा उपद्रव जास्त प्रमाणात आढळतो. यामुळे कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी तज्ञांनी खालील शिफारशी केल्या आहेत.
मावा, तुडतुडे, फुलकिडे : या किडीच्या नियंत्रणासाठी गार्डनिम २० मि.ली. किंवा निंबोळी अर्क ५ टक्के किंवा डायमेथोएट ३० टक्के १० मि.ली. किंवा इमिडाक्लोप्रिड ४ मि.ली. १० लीटर पाणी याप्रमाणे फवारावे. पेरणीनंतर किमान तीन आठवड्यांनी फवारणी करायला पाहिजे, आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी.
शेंगा पोखरणारी अळी : या किडीचे वेळेवर नियंत्रण न केल्यास खूप नुकसान होते. यासाठी निमकरंज २० मि.ली. किंवा निंबोळी अर्क ५ टक्के किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के १५ मि.ली. किंवा डेल्टामेथ्रीन ५ मि.ली. किंवा एच.एन.पी.व्ही १० मि.ली. १० लीटर पाण्यातून फवारावे. आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी.
रोग नियंत्रण : भुरी : या रोगाच्या नियंत्रणासाठी फंगीनिल २० मि.ली. किंवा पाण्यात मिसळणारे गंधक ८ टक्के २५ ग्रॅम किंवा डिनोकॅप ४० डब्लूपी १० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे किंवा गंधकाची भुकटी ३०० मेश प्रति एकरी ८ किलो या प्रमाणात धुरळावी. त्यानंतर १५ दिवसांच्या अंतराने फवारणी किंवा धुरळणी करावी. रोगास प्रतिबंधक अशा जातींचा वापर करावा.
मर : या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास ५ मि.ली. ट्रायकोडर्मा किंवा कार्बेन्डॅझीम ३ ते ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. तसेच लागवडीच्या वेळी प्रति हेक्टर ५ ते ६ किलो ट्रायकोडर्मा पावडर शेणखतात मिसळून जमिनीत मिसळावे.