नाशिक : टोमॅटो पिकावर कुकुंम्बर मोझॅक व्हायरस व इतर विषाणू रोगांच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट व गुणवत्तेवर परिणाम होत असल्याच्या शेतकर्यांच्या तक्रारी आहेत. यामुळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होते. यामुळे टोमॅटो पिकावरील कीड व रोगांचे व्यवस्थापन करण्याची आवश्यकता असते. आज आपण याची तंत्रशुध्द माहिती जाणून घेणार आहोत.
टोबॅटो मोझॅक व्हायरस, कुकुंबर मोझॅक व्हायरस, पोटॅटो मोझॅक व्हायरस या विषाणूमुळे टोमॅटोवर मोझॅक रोग आढळून येतो. या रोगामुळे पाने फिक्कट हिरवी होतात. ती बारीक राहून त्यामध्ये हिरवट, पिवळसर डाग दिसतात झाडाची वाढ खुंटते, फुले-फळे फार कमी प्रमाणात लागतात. रोगग्रस्त रोपांची लागवड केल्यास किंवा जमिनीतील रोगग्रस्त अवशेषामुळे रोपांच्या मुळांना लागण होऊन रोगाची सुरुवात होते. हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे टोमॅटोची लागवड करताना तसेच आंतरमशागतीची कामे करतेवेळी, स्पर्शाने व मावा या किडीमार्फत रोगाचा प्रसार अतिशय वेगाने होतो.
विषाणूजन्य रोगावरील उपाययोजना
या विषाणूजन्य रोगाचा प्रसार प्रामुख्याने फुलकीडे, पांढरी माशी, मावा, तुडतुडे या किडीमार्फत होतो. रोगाचा प्रार्दुभाव झाल्यानंतर रोगाच्या नियंत्रणासाठी त्यावर औषधांचा उपयोग होत नाही. त्यामुळे किडीमार्फत होणारा प्रसार थांबविणे हाच एकमेव उपाय आहे. रोपवाटिका नियंत्रित परिस्थितीमध्ये उत्पादित असाव्यात ज्यामध्ये रोपे ही कीटकरोधी नेटमध्ये तयार केलेली असावीत.
मावा, पांढरी माशी, फुलकिडे, लाल कोळी या किडींवरील उपाययोजना पुढीलप्रमाणे :
टोमॅटो बीजप्रक्रीयेच्या वेळी इमिडाक्लोप्रिड ५ ग्रॅम/कार्बोसल्फान ३० ग्रॅम/ कि.ग्रॅ. बियाणे या प्रमाणात करावी.
पुनर्लागवडीच्या वेळी मुख्य पिकाच्या कडेने मका आणि चवळी ही आंतरपिके लावावी.
रोपे प्रक्रिया : पुनर्लागवडीच्या वेळी रोप इमिडाक्लोप्रिड १० मि.ली. किंवा कार्बोसल्फान १० मि.ली. १० लीटर पाणी या द्रावणात २ तास बुडवून नंतर लावावीत, पुनर्लागवडीच्या वेळी शेतात निंबोळी पेंड हेक्टरी ४०० -५०० कि.ग्रॅ. टाकावी.
टोमॅटो पिकावरील फळे येण्यापूर्वी रस शोषणार्या किडीसाठी कीडनाशकाची फवारणी गरजेनुसार करावी, मिथील डिमेटॉन १० मि.ली. किंवा डायमेथोएट १० मि.ली. किंवा इमिडाक्लोप्रिड १० मि.ली. किंवा कार्बोसल्फान १० मि.ली. किंवा थायमेथॉक्झाम ४ ग्रॅम + १० लीटर पाणी यांची फवारणी करावी.
जैविक कीडनाशकामध्ये व्हर्टिसिलियम २० ग्रॅम १० लीटर पाणी किंवा निंबोळी अर्क ४ टक्के यांचा वापर करावा.
लाल कोळी या किडीसाठी गरजेनुसार फवारणी करावी,
पाण्यात मिसळणारी गंधक पावडर २० ग्रॅ. किंवा डायमेथोएट १० मि.ली.+पाण्यात मिसळणारी गंधक पावडर २० ग्रॅ.किंवा व्हर्टिसिलियम २० ग्रॅम किंवा प्रोपरगाइट (ओमाईट) १० मि.ली. प्रती १० लीटर पाण्यात फवारणी करावी.
मावा, पांढरी माशी या किडीसाठी साईट्रीनीलीप्रोल १०.२६ टक्के ओ.डी ९० ग्रॅ. ५०० लि. पाणी किंवा क्लोरॅनथ्रॅनीलीप्रोल ८.८० टक्के+थायमेथोक्झॅम १७.५० टक्के डब्ल्यू/डब्ल्यू.एस.सी ५० ते १०० एम.एल प्रति ५०० लि.पाणी,
फुलकिडे आणि लाल कोळीसाठी स्पिरोमेसीफन २२.९० टक्के ई.सी १५० ग्रॅम प्रति ५०० लि. पाण्यात फवारणी करावी, लाल कोळीसाठी फेनाझॅक्वीन १० टक्के ई.सी १२५ ग्रॅ. प्रति ५०० लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.