अशा प्रकारे हळद काढणी आणि त्यावरील प्रक्रिया केल्यास मिळू शकते लाखोंचे उत्पादन

haladi-turmeric

नागपूर : हळद लागवडीतून मोठा आर्थिक नफा कमविता येतो, याचे गणित आता अनेक प्रगतिशिल शेतकर्‍यांना कळाले आहे. सुधारित तंत्रानुसार लागवड केल्यास ओल्या हळदीचे प्रती हेक्टरी २५० ते ३५० क्विंटल तर वाळलेल्या हळदीचे ६० ते ७५ क्विंटल एवढे उत्पादन मिळते. अनेक शेतकरी योग्य पध्दतीने हळद लागवड करतात मात्र त्यांना हळद काढणी आणि त्यावरील प्रक्रिया तंत्रशुध्द पध्दतीने कशी करावी? याची माहिती नसते. यामुळे शेतकर्‍यांना अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही. यामुळे आज आपण हळद काढणी व त्यावरील प्रक्रिया याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

बेने लावल्यापासून ८ ते ९ महिन्यांनी पिक काढणीस तयार होते. काढणी साधारण फेब्रुवारी ते एप्रिल पर्यंत चालते. पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात. तेंव्हा काढणीची योग्य वेळ असते. जमीन थोडी ओलसर असल्यास कंद काढणे सोपे जाते त्यामुळे पिकाची काढणी करण्यापूर्वी १५ दिवस आधी पिकाला पाणी देणे बंद करावे. कंद काढण्यापूर्वी संपूर्ण पाने जमिनीलगत कापून घ्यावी. कुदळीने कंद काढून त्यातील जेथे गड्डे वेगळे करावे. कंदावरील मुळे कापावे व माती स्वच्छ पाण्याने धुवून काढावी.

हळद काढणीची केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेने विकसित केलेली सुधारित पध्दत
काही शेतकरी हळद काढणीच्या पारंपारिक पध्दतीचा अवलंब करतात. मात्र यात वेळ, श्रम व पैसा जास्त लागतो. यासाठी हळद काढणीची केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेने विकसित केलेली सुधारित पध्दतीचा वापर केल्यास फायदा होवू शकतो. या पध्दतीमध्ये हळद कंद स्वच्छ धुवून, मुळ्या कापून घेतात. गड्डे काढल्यापासून २-३ दिवसात प्रक्रिया करावी. डिझेलच्या टाक्यापासून १.५ फूट उंची व २ फूट व्यासाचे सच्छिद्र ड्रम बनून घ्यावे. एका ड्रममध्ये ४५ ते ५० किलो कच्ची हळद भरावी व कढईला झाकण लावावे. हळद शिजविताना त्यामध्ये ०.०५ ते ०.१ टक्के सोडियम कार्बोनेट व ६० किलो ओल्या हळदीसाठी २० ग्रॅम सोडियम बायसल्फाईट व २० ग्रॅम हायड्रोक्‍लोरिक अ‍ॅसिड टाकावे. साधारणता २० ते २५ मिनिटात हळद शिजते.

हळद वाळविण्याची व पॉलिश करण्याची योग्य पध्दत
हळद वाळविण्याची क्रिया फरशीवर किंवा सिमेंट काँक्रीटवर करावी. साधारण ५ ते ६ से.मी. जाडीचा थर पसरून ठेवावा. यापेक्षा कमी जाडीचा थर असल्यास कुरकुमीनचे प्रमाण कमी होते. तसेच हळकुंडाचे काम करून वाळवल्यासही उष्णतेमुळे कुरकुमिन हे रंगद्रव्य उडून जाते व हळदीस फिक्कट रंग येतो. हळ्द एकसारखी वाळावी म्हणून अधून मधून गड्ड्यांची उलथापालथ करावी. हळद वाळवून चांगली टणक झाल्यानंतर पॉलिश करावी. पॉलिश केल्यामुळे कठीण काळपट निघून जातात व हळद स्वच्छ होऊन पिवळी, चमकदार व गुळगुळीत बनते. पॉलिशिंगमुळे हळकुंडाला चकाकी व उजळ धमक पिवळा रंग येतो. पॉलिश केल्यावर चांगला बाजारभाव मिळतो. १ क्विंटल हळदीच्या पॉलिशिंगसाठी तुरटी- ४० ग्रॅम, हळद पावडर- २ किलो, एरंडीचे तेल- १४० ग्रॅम, खाण्याचा सोडा ३० ग्रॅम याच्या द्रावणाची शिफारस केली आहे.

Exit mobile version