काय सांगता; गांडूळ विक्रीतून दरमहा पाच लाखांची कमाई; तरुण शेतकर्‍याचे स्टार्टअप

earning rs 5 lakh per month from earthworm sales startup of young farmers

बीड : अलीकडच्या काही वर्षांमध्ये सेंद्रीय शेतीला अनन्यसाधारण महत्व आले आहे. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही सेंद्रीय शेतीचे महत्व अनेकांना पटले आहे. सेंद्रीय शेतीमध्ये गांडूळांना प्रचंड महत्व असते. कारण सेंद्रीय शेतीमध्ये गांडूळ खतांची मोठी मागणी असते. नेमका हाच धागा पकडून बीडमधील एका तरुण शेतकर्‍याने गांडूळ प्रकल्प सुरु केला आहे. या गांडूळांची मागणी केवळ बीडपुरता मर्यादित नसून परदेशातही या गांडूळांना मोठी मागणी आहे.

अमरनाथ आंदुरे या तरुण शेतकर्‍याने पाटोदा तालुक्यातील पारनेर येथे नेचर ग्रोटेकची स्थापना करत शेतीसंदर्भात संशोधन सुरु केले. येथे शेतकर्‍यांना सेंद्रिय शेतीचे धडे दिले जातात. यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे गांडूळ खत!

गांडूळ खताची मागणी वाढत गेल्याने अमरनाथ यांनी पुण्यामध्यही नवे युनिट सुरु केले. आपल्या या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी भारतातच नाही तर विदेशात देखील गांडूळ खत आणि गांडुळाची निर्यात केली आहे. कंपोस्ट खत तयार करणार्‍या जिवंत गांडुळाची मागणी परदेशातून सध्या होत आहे. हीच गरज लक्षात घेऊन अमरनाथ यांनी उमान या देशात आठ लाख रुपये किमतीच्या चार टन गांडूळाची निर्यात केली आहे.

अमरनाथ यांनी आपल्या स्वतःच्या शेतात तयार केलेल्या गांडूळ खत प्रकल्प सहा वर्मी बेड ठेवण्यात आले आहेत. या वर्मी बेडमध्ये कंपोस्ट खताची निर्मिती केली जाते. त्यानंतर ऑर्डरप्रमाणे इतर शेतकर्‍यांना देखील या खताची विक्री केली जाते. या प्रकल्पातून तयार होणारे खत जिवंत गांडूळ आणि वर्मी बेड याच्या विक्रीतून ते महिन्याला चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवितात.

इतरांसाठी मार्गदर्शक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारीला सादर केलेल्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रातील स्टार्टअप संदर्भात महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामुळे आगामी काळात अ‍ॅग्रो स्टार्टअपची संख्या निश्‍चितपणे वाढणार आहे. मात्र त्याआधी बीडमधील अमरनाथ आंदुरे या तरुण शेतकर्‍याने सुरु केलेले नेचर ग्रोटेक हे स्टार्टअप निश्‍चितच इतरांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे.

Exit mobile version