निर्यात बंदीमुळे गव्हाच्या दरांवर होणार असा परिणाम

wheat

जळगाव : रशिया हा गव्हाचा सर्वात मोठा उत्पादक आहे तर युक्रेन गव्हाचे उत्पादन घेण्यात पाचव्या क्रमांकावर आहे. दोन्ही देशांमध्ये युध्द सुरु असल्याने जगभरात गव्हाची मागणी जास्त आणि पुरवठा कमी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यापार्श्‍वभूमीवर भारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

या निर्यात बंदीचे परिणात स्थानिक बाजारपेठेतही दिसू लागले आहेत. सध्या बाजारपेठेत गव्हाच्या दरात प्रति क्विंटल १०० ते २०० रुपयांनी वाढ झाली आहे. येणार्‍या काळात दर अजून वाढतील या अपेक्षेने शेतकर्‍यांनी गव्हाची विक्री करण्याऐवजी साठवणूक करण्यावर भर देतांना दिसत आहेत.

सरकारने गव्हाची किमान आधारभूत किंमत २ हजार १५ रुपये निश्चित केली आहे. मात्र खुल्या बाजारपेठेत २ हजार १०० प्रतिक्विंटलने खरेदी होत असलेला गहू आता २ हजार २०० प्रतिक्विंटलने खरेदी केला जात आहे. गव्हाचे दर वाढल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधान आहे. हमीभावापेक्षा अधिकच्या दराने गहू विकण्याची ही पहिलीच वेळ आहे. निर्यातीवर बंदी घातल्याने येत्या काळात गव्हाचे दर हे ३ हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहचतील कारण गव्हाचे उत्पादन तर घटले आहेच पण मागणी वाढलेली आहे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भारतीय किसान युनियनने केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. निर्यातीवर बंदी घालून सरकारने योग्यच पाऊल उचलले आहे. अशीच निर्यात सुरु राहिली असती तर अन्नधान्याचे संकट देशावर ओढावले असते. रशिया-युक्रेन युद्धामुळे गव्हाचा जागतिक पातळीवर तुटवडा निर्माण झाला आहे. भारतातून गव्हाची निर्यातही होत असे, मात्र यंदा उत्पादन घटले आहे. शेतकर्‍यांनी तेलबियांच्या उत्पादनावर अधिक भर दिला, त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे.

Exit mobile version