शेतकाऱ्याने शोधले सोयाबीनचे वाण; पेटंटही मिळवले

farmer discovers soybean varieties also obtained patents

चंद्रपूरः चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यातील वायगाव-भोयर या गावातील शेतकरी सुरेश गरमडे यांना सोयाबीनच्या नव्या वाणाच्या शोधासाठी स्वामित्व हक्क मिळाले आहे. एसबीजी ९९७ नावाच्या सोयाबीन वाणासाठी गेले १२ वर्ष त्यांचे अथक प्रयत्न चालले होते. काही वर्षांपूर्वी स्वतःच्या शेतातील सोयाबीन रोपट्यांमध्ये त्यांना काही रोपटी वेगळी आढळल्याने त्यांचे १० वर्षे जतन -संवर्धन करत या भरघोस शेंगा असलेल्या वाणाची लागवड केली. या संपूर्ण प्रयत्नांची दखल चंद्रपूरचा कृषी विभाग- राहुरी कृषी विद्यापीठ व शासनाने वेळोवेळी घेतली होती. पाठपुराव्याअंती अखेर दिल्लीच्या वनस्पती विविधता आणि शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरणाने त्यांना हे पेटंट बहाल केले आहे.

याआधी चंद्रपूरच्या नांदेड या गावातील कृषिभूषण शेतकरी दादाजी खोब्रागडे यांनी नव्या HMTया धान वाणाचा शोध लावून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला होता. सुरेश गरमडे यांनी त्यांनाच गुरू मानत हे संशोधन केले आहे. सुरेश गरमडे यांच्या या नव्या सोयाबीन वाण संशोधनाला कृषी विभागाने वेळोवेळी तांत्रिक सहाय्य केले आहे. दिल्लीत स्वामित्व हक्क मिळवेपर्यंत गरमडे यांना याबाबत सहकार्य करण्यात आले. यापुढच्या काळातही हे स्वामित्व हक्क महाराष्ट्रात अधिक संख्येने शेतकऱ्यांपर्यंत पोहचून सोयाबीन उत्पादनाबाबत भरभराट व्हावी यासाठी कृषी विभाग सहकार्य करणार आहे.

सोयाबीन आताशा विदर्भ व महाराष्ट्रात प्रमुख नगदी पीक म्हणून प्रचलित झाले आहे. सोयाबीनचा उतारा सर्वाधिक व्हावा व रोगांपासून बचाव व्हावा यासाठी शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत असतात. अनुभवसिद्ध शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने आपलेच संशोधन शेवटापर्यंत नेत त्याचा उपयोग सामान्य शेतकऱ्यांसाठी केल्यास शेती सहकार्याचे नवे क्षेत्र उघडणारी ठरणार आहे.

प्रतिकूल हवामान व रोगराईला बळी न पडणारी व भरघोस उत्पन्न देणारी SBG-९९७ जात आता शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्यासाठी वापरता येणार आहे. इतर वाणांच्या तुलनेत यात तेलाचे प्रमाणही अधिक आहे. गरमडे हे सोयाबीन उत्पादक शेतकरी (Soybean Producer Farmer) असून बारा वर्षांपूर्वी त्यांच्या सोयाबीनच्या शेतामध्ये त्यांना वेगळ्या गुणधर्माच्या दोन वनस्पती आढळून आल्या. धानाच्या एचएमटी वाणाचे जनक स्वर्गीय दादाजी खोब्रागडे यांचा आदर्श समोर ठेवून त्यांनी सतत आठ वर्ष बियाण्याची वाढ करत त्याचे जतन व संवर्धन केले. हे वाण प्रतिकूल हवामानातही ‘यलो मोझॅक’ रोगाला बळी पडत नसून एकरी १७ क्विंटल उत्पादन देते.

कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सुरेश गरमडे यांच्या शेतीची वारंवार पाहणी केली होती. सलग आठ वर्षांपासून एकच निष्कर्ष हाती येत असल्याने कृषी अधिकारीदेखील थक्क झाले होते, असा दावा सुरेश गरमडे यांनी केला आहे. अशा शेतकरी उपयोगी वाणाचे पेटंट मिळवण्यासाठी गरमडे यांनी वनस्पती विविधता आणि शेतकरी हक्क संरक्षण कायदा २००१ अंतर्गत महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या पाठपुराव्यातून पुणे येथे स्थापन झालेल्या पेटंट प्राधिकरण कार्यालयात मे २०१८ मध्ये प्रस्ताव दाखल केला होता.

हा प्रस्ताव दिल्ली येथील मुख्य कार्यालयात पाठवण्यात आला होता. त्यानंतर सलग तीन वर्ष सोयाबीन संशोधन केंद्रात या वाणाचा मागोवा घेण्यात आला होता. तिथे सुद्धा हे वाण सरस आणि वेगळे आढळून आल्याने वनस्पती विविधता आणि शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरणाने गरमडे यांना त्यांच्या जातीचे उत्पादन, विक्री, बाजार, वितरण, आयात किंवा निर्यात करण्याचा अधिकार दिले आहेत. हे वाण सोयाबीनच्या उत्पादनामध्ये क्रांती ठरू शकते. शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करू शकते. म्हणून हे वाण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ, असा निर्धार गरमडे यांनी व्यक्त केला आहे.

नव्या सोयाबीन वाणाची वैशिष्ट्ये

Exit mobile version