खरिपात धुळपेरणी, आता पिक जोपासण्यासाठी शेतकर्‍यांची कसरत

save crop

औरंगाबाद : मराठवाड्यात दमदार पावसाअभावी धूळपेरणी केलेली पिके आता धोक्यात आहेत. परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात अधिकच्या क्षेत्रावर धूळपेरणी झाली आहे. जमिनीतील ओलीमुळे पिकांची उगवण तर झाली आहे पण उगवल्या-उगवल्याच पिकांनी माना टाकल्या आहेत. आता उगवलेले पीक बहरावे यासाठी जिल्ह्यातील शेतकरी प्रत्येक पिकाला हाताने पाणी देवून पिकांना जगविण्याची धडपड करतांना दिसत आहे.

जून महिना उलटत आला तरी राज्यातील अनेक भागांमध्ये दमदार पावसाची प्रतिक्षा लागून आहे. हवामान खात्याच्या अंदाजामुळे काही ठिकाणी शेतकर्‍यांची निराशा केली आहे. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजामुळे शेतकर्‍यांनी धूळपेरणीचे धाडस केले पण आता पहिली पेरणी धोक्यात आली आहे. कारण मृग नक्षत्राचे १० दिवस उलटून गेले तरी पावसाने उघडीपच दिलेली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे किमान या आठवड्यात तरी पाऊस हजेरी लावेल या आशेने शेतकरी आता प्रत्येक पिकाला पाणी देवून जगविण्याची धडपड करत आहेत.

मशागतीपासून ते पेरणीपर्यंतची कामे ट्रॅक्टरच्या आधारे आणि वाढलेली महागाई यामुळे शेती खर्चही वाढला आहे. उत्पादन बेभरवश्याचे का असेना पण खर्च हा ठरलेला आहे. त्यामुळे पावसाने अशीच उघडीप दिली तर पुन्हा बियाणांचा खर्च आहेच. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची प्रतिक्षा करीत आहे. या आठवड्यात मान्सून सर्वत्र बरसेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

Exit mobile version