रोहित्रासाठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Success farmer

सटाणा : करंजाड (ता. सटाणा) येथील भुयाणे शिवारातील शेतकरी वीज वितरण कंपनीच्या चुकीच्या कारभारामुळे त्रस्त आहेत. या परिसरात एकाच रोहित्रावर २६ शेतकऱ्यांचे कृषी वीजपंप असल्याने, वारंवार रोहित्र जळण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून दुय्यम रोहित्राची मागणी करीत आहेत. मात्र वीज वितरण कंपनी टोलवाटोलवीची उत्तर देऊन वेळ मारून नेत आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. वीज वितरण कंपनीने दखल घेऊन दुय्यम रोहित्र बसवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

भुयाणे शिवारातील रोहित्र क्रमांक एकवर तब्बल २६ कृषी वीजपंपाचे जोड आहेत. यामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. आजतागायत दुय्यम रोहित्र बसविण्यात न आल्याने जुन्याच रोहित्रावर तब्बल २६ शेतकरी वीजपंप चालवीत आहेत. त्यामुळे कमी-अधिक दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे रोहित्र वारंवार जळत आहे. पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची अडवणूक थांबवत शेतकऱ्यांकडे उपलब्ध शुल्क रकमेचा स्वीकार करून जळालेले वा नवीन रोहित्र (डीपी) देण्याची मागणी शेतकऱयांकडून होत आहे.

सात वर्षांपासून वर्षांपासून शेतकरी  दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, नापिकी, गारपिट, कीड, पडलेले बाजारभाव यामुळे प्रचंड आर्थिक अडचणीत आला आहे. गेल्या खरीप हंगामात झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णतः कोलमडून पडला आहे. शेतकऱ्यांच्या हातात केवळ चालु रब्बी हंगामातील पिक असून, मात्र या पिकावर देखील जळालेले रोहित्र (डीपी) व विजेचा लपंडाव ही मोठी समस्या आहे. या अवस्थेतही तो उपलब्ध साधनातून या रोहित्राचे वीजबिल शुल्क रक्कम भरण्याची तजवीज करीत आहे. मात्र, अनेक वेळा ही तजवीज अपुरी पडते. अशा परिस्थितीती शेतकऱ्यांचा या संकटकाळात सहानुभूतीपूर्वक विचार करून अडवणूक न करता सहकार्याची भूमिका घेत जळालेल्या रोहित्रासाठी त्यांच्याकडे उपलब्ध रक्कम स्वीकार करून उर्वरित योग्य रकमेचे टप्पे पाडून या अडचणीच्या परिस्थितीत सहकार्य करणे अपेक्षीत असतांना, वीज कंपनी शेतकऱयांच्या मागणीकड़े दुर्लक्ष करीत असल्याने, शेतकऱयांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Exit mobile version