पाणी टंचाई असतांनाही हायड्रोजेल तंत्रज्ञानाने शेतकरी वाढवू शकतात ३० टक्के उत्पादन

money farmer

पुणे : शेतीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. मात्र कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत असते. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अनेक शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर करतात. मात्र आता हायड्रोजेल तंत्रज्ञान हा नवा पर्याय शेतकर्‍यांसमोर उभा राहिला आहे. हायड्रोजेल तंत्रज्ञानाने सिंचन करून शेतकरी कमी खर्चात आणि कमी पाण्यातही अधिक उत्पादन घेऊ शकतात. एका अंदाजानुसार, आपल्या पिकांमध्ये या सिंचन तंत्राचा वापर करून ३० टक्क्यांपर्यंत अधिक उत्पादन मिळू शकते.

अलीकडच्या काही वर्षांमध्ये पाणीटंचाईमुळे शेतकर्‍यांच्या अडचणी वाढत आहेत. त्यामुळे भविष्यात शेती करणे कठीण होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी हायड्रोजेल तयार केले आहे, जे दुष्काळी भागातील शेतीसाठी उपयुक्त ठरत आहे. ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे किंवा जेथे सिंचनासाठी उपलब्ध साधने उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी याचा वापर केला जातो कारण पाण्याअभावी शेतकर्‍यांना पाणी विकत घ्यावे लागते आणि त्याचा खर्चही खूप जास्त असतो. अशा परिस्थितीत हे हायड्रोजेल शेतकर्‍यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

काय आहे हायड्रोजेल तंत्रज्ञान
हायड्रोजेल हे एक जेल आहे जे पाण्यात मिसळताच जास्तीत जास्त पाणी शोषून घेते. ते झाडांच्या मुळांजवळ राहतात कारण मुळांना पाण्याची सर्वाधिक कमतरता असते. आपण ते ३-४ वेळा वापरू शकता. यामुळे तुमच्या शेतीचे नुकसान होणार नाही. हे सहसा गवार गम किंवा त्यापासून बनवलेल्या पावडरपासून बनवले जाते. झारखंडची राजधानी रांची येथील इंडियन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रेझिन अँड गममध्ये हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. हायड्रोजेल तंत्रज्ञानाचा वापर सिंचनासाठी कॅप्सूल किंवा गोळ्यांच्या स्वरूपात केला जातो. एका एकरात फक्त २-३ किलो हायड्रोजेल लागते. ४०-५० अंश सेल्सिअस तापमानातही ते खराब होत नाही. या तंत्रज्ञानाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते जैव-विघटनशील आहे. त्याचा वापर करून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. एवढेच नाही तर याच्या मदतीने शेतातील व परिसरातील भूजल पातळीतही सुधारणा करता येते, कारण त्याच्या वापराने ५० ते ७० टक्के पाणी जमिनीत मुरते.

Exit mobile version