शेतकर्‍यांनो तुम्ही आंतरपीक घेतात का? हे आहेत फायदे

inter cropping

नाशिक : शेतकर्‍यांना नेहमी आंतरपीक घेण्याचा सल्ला देण्यात येतो. यास अनेक कारणे आहेत. प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास, एकाच क्षेत्रावरील एकापेक्षा अधिक पिकांचे उत्पादन घेता येते. मुख्य पिकासाठी केल्या जाणार्‍या खत व पाणी व्यवस्थापनामुळे आंतरपेकिासाठी वेगळा खर्च करावा लागणार नाही. आंतरपिकामुळे तणाची वाढ कमी होऊन तण नियंत्रणास मदत होते. किंडरोगाचा प्रादुर्भाव नियंत्रित राखण्यास देखील मदत होते. आंतरपिकामधील द्विदलधान्याच्या मुळांवरील गाठींमुळे जमिनीतील नत्र स्थिरीकरणाचे कार्य सुधारुन सुपिकता वाढण्यास मदत होते. इत्यादिंचा उल्लेख करता येईल.

सोयाबीन + तूर आंतरपिक
हमखास पाऊस पडणार्‍या (७० मि. मी. पेक्षा अधिक)भागात ४५ सें.मी. हून अधिक खोली असणार्‍या जमिनीत सोयाबीनच्या चार ओळीनंतर मध्यम कालावधीच्या तुरीची (१५० ते १६० दिवस) एक ओळ या पध्दतीने पिकांचे उत्पादन मिळते. एक पीक हातचे गेले तरी किमान एका पिकातून चांगले उत्पादन मिळू शकते.

भाताच्या बांधावर तूर लागवड
राज्यामध्ये भात पिकाखालील १४.९० लाख हे. क्षेत्र आहे. यापैकी बहुतांश क्षेत्र हे पुर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्हयांमध्ये येते. या ठिकाणी भातशेतीचे बांध हे रुंद असल्याने अशा बांधांचा वापर तुरीचे पीक घेण्यासाठी होऊ शकतो, हे पटल्यामुळे सध्या भात उत्पादक शेतकर्‍यांना बांधावर तुरीची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. भात पिकाच्या काढणीनंतर जमिनीतील ओलाव्यावर बांधावरील तुरीचे पीक चांगले फोफावते आणि शेतकर्‍यास बोनस उत्पादन मिळते.

कापूस + मूग/उडीद
मूग व उडीद पिकाखालील क्षेत्र वाढविण्यासाठी ही पिके कापसात ओळी कमी न करता दोन ओळीत मूग किंवा उडीदाची एक ओळ पेरल्यास फायदेशीर ठरते. मूग व उडीद पिकांची काढणी लवकर होत असल्याने त्यांचे अवशेष जमिनीत कुजून मातीचा पोत सुधारण्याबरोबरच त्याचा फायदा कापूस पिकास होतो. अशारितीने राज्यातील सोयाबीन, कापूस, ज्वारी, बाजरी, भात व ऊस उत्पादकांनी तूर, मूग, उडीद, हरभरा या कडधान्यांची आंतरपीक पध्दतीने लागवड केल्यास निश्चितच फायदेशीर ठरणार आहे.

स्त्रोत – कृषी विभाग महाराष्ट्र शासन

Exit mobile version