काय तो पाऊस…काय त्या पेरण्या… काय तो शेतकर्‍यांचा उत्साह; सर्व एकदम ओक्केच

farmer

जळगाव : गत सात-आठ दिवसांपासून होत असलेल्या पावसाने खरिप हंगामाचे चित्रच बदलून टाकले आहे. रखडलेल्या पेरण्या तर कुठे दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांवर घोंगावत असतांना सध्या राज्यभरात बरसत असलेल्या पावसाने खरिप हंगामाला जीवनदान दिले आहे. सर्वत्र पोषक वातावरण निर्माण झाल्याने सर्वच भागांमध्ये उर्वरित पेरण्यांचा कमालीचा वेग आला आहे. यामुळे शेतशिवार शेतकर्‍यांच्या उत्साहाने गजबजलेले दिसत आहे.

जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठराला आहे. जुलै महिना उजाडताच सुरु झालेला पाऊस अजूनही कायम आहे. यामुळे पेरणी योग्य वातावरण तर निर्माण झालेच आहे शिवाय नद्या, नाले तुडूंब भरल्याने सिंचनाचाही प्रश्‍न मिटला आहे. यामुळे पेरणी कामांना आता गती येत आहे. पेरणीचा कालावधी निघून जात असल्याने अनेक शेतकर्‍यांनी धूळपेरणी केली. त्याचा फायदा देखील आता होत आहे. पहिल्या पेर्‍यातील सोयाबीन आणि कापसाच्या मशागतीची कामे ही भर पावसात केली जात आहेत. पावसाने सर्व चित्र बदलून गेल्याने शेतकर्‍यांमध्येही कमालीचा उत्साह आहे.

गत हंगामात कापूस व सोयाबीनला विक्रमी दर मिळाल्याने त्यांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे तर सध्याच्या पोषक वातावरणामुळे उत्पादनात भर पडेल असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे. या पावसाचा फायदा खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर आणि धानपिकाला होत आहे. त्यामुळे यंदा खरिपाच्या बाबतीत सर्वकाही उशीराने घडले असले तरी सध्याची परिस्थिती शेतकर्‍यांसाठी अत्यंत अनुकुल आहे.

पावसाने मध्यंतरी दडी मारल्याने शेतकर्‍यांनी उडीद, मुगाकडे दुर्लक्ष केले असले तरी कापसू, सोयाबीन, तूर आणि धान पिकांच्या पेरण्या आता अंतिम टप्प्यात आहे. पावसामुळे या पिकांची वाढ जोमात होणार आहे. सोयाबीनसह कापूस, तूर, धान पिकाचा पेरा हा १५ जुलैपर्यंत झाला तरी उत्पादनात घट होणार नसल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. त्यामुळे शेतकरी आता सोयाबीन आणि कापसावर भर देत आहेत. शिवाय कमी कालावधीत येणार्‍या वाणावर शेतकरी लक्ष केंद्रीत केले आहे.

Exit mobile version