शेतकऱ्यांनी काढले तब्बल ४० हजार कोटी रुपयांचे उत्पादन!

ethanol-maharashtra-farmer

फोटो प्रतीकात्मक

पुणे : देशातील साखर कारखान्यांची इथेनॉल निर्मितीची ४५० कोटी लिटर्सची क्षमता असून २०२०-२१ मध्ये ३०२ कोटी लिटर्सची निर्मिती झाली आहे. याची बाजारभावाशी तुलना केली असता शेतकऱ्यांनी तब्बल ४० हजार कोटी रुपयांच्या इथेनॉलची निर्मिती केली आहे. देशाच्या उत्पादनात महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचा वाटा थोडा थोडका नव्हे तर तब्बल २६ टक्के इतका राहिला आहे.

पुढील दोन वर्षांत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. इथेनॉलसारख्या जैवइंधनाचा वापर परदेशात मोठ्या प्रमाणात होतो आहे. त्या तुलनेत भारतात क्षमता असूनही इथेनॉलचा प्रभावी वापर होत नाही. केंद्र सरकारने सी मोलॅसिस (मळी), बी हेवी मोलॅसिस आणि ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्याची परवानगी दिली आहे. देशात निर्माण होणार्‍या इथेनॉलपैकी निम्मे इथेनॉल साखर उद्योगापासून तर निम्मे धान्यापासून तयार होते. इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ४५ कारखान्यांना डिस्टलरीसाठी यंदा परवानगी दिली आहे. डिस्टलरीची उभारणी होऊन प्रत्यक्ष उत्पादनाला एक वर्षाचा कालावधी अपेक्षित आहे. नव्याने उभारल्या जाणार्‍या डिस्टलरीमधून आणखी ४० कोटी लिटर्स इथेनॉलचे उत्पादन होणार आहे.

महाराष्ट्र उत्तर प्रदेशला मागे टाकणार

देशात उत्तरप्रदेशातील मोठ्याप्रमाणातील कारखानदारीमुळे या राज्यातून ११० कोटी लिटर्स इथेनॉलचे उत्पादन केले जाते. महाराष्ट्रातील नव्या डिस्टलरी कार्यान्वित होताच, महाराष्ट्र इथेनॉल उत्पादनात उत्तर प्रदेशाला लवकरच मागे टाकू शकतो. कर्नाटकमध्ये ४० कोटी लिटर्स इथेनॉलचे उत्पादन केले जाते.

Exit mobile version