शेतकर्‍यांनी सोयाबीन पिकावर फिरवले रोटावेटर, कारण वाचून बसले धक्का

Farmers rotate rotavators on soybean crops

उस्मानाबाद : खरीप हंगामातील पिकांची उगवणच होताच तब्बल महिनाभर पावसामध्ये सातत्य राहिले होते. त्यामुळे खरिपातील पिके ही पिवळी पडली आहेत. शेतकर्‍यांना मशागत आणि किटकनाशक फवारणीसाठी देखील वेळ मिळाला नाही. या दरम्यानच्या काळात सोयाबीनची वाढ सुरु असतानाच सोयाबीनवर गोगलगायींनी हल्ला चढविला. यातून कसेबसे सावरत असतांना आता सोयाबीनवर यलो मोजॅकचा प्रादुर्भाव वाढल्याने सोयाबीन पिवळे तर पडत आहे पण भविष्यात याला शेंगा देखील लागत नाहीत. या त्रासाला कंटाळून उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांनी सोयाबीन पिकावर थेट रोटावेटर फिरवले आहे.

यंदाच्या खरीप हंगामातील पिकांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पेरणी झाली की लागून राहिलेल्या पावसामध्ये तब्बल महिनाभर सातत्य राहिले होते. त्यामुळे पिकांची वाढ तर खुंटलीच पण अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. सोयाबीनची उगवण होताच त्यावर गोगलगायीचा प्रादुर्भाव झाला होता. उस्मानाबाद, बीड जिल्ह्यामध्ये उगवण झाली की लागलीच गोगलगायीने सोयाबीन फस्त केले होते. त्यांचा बंदोबस्त केल्यानंतर आता यलो मोजॅक व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे पिके ही पिवळी पडत असून जागेवर वाळून जात आहे.

यलो मोजॅकचा प्रादुर्भाव वाढल्याने सोयाबीन पिवळे तर पडत आहे पण भविष्यात याला शेंगा देखील लागत नाहीत. त्यामुळे परिश्रम आणि पैसै वाया घालण्यापेक्षा सोयाबीन मोडून दुसरे पीक घेण्याच्या उद्देशाने कळंब तालुक्यातील एकरुका येथील शेतकरी रामहरी घाटगे यांनी ५ एकरावरील सोयाबीनवर रोटावेटर फिरवले आहे. गोगलगायीपासून सोयाबीनला वाचविल्यानंतर आता येलो मोजॅकचा प्रादुर्भाव वाढल्याने सोयाबीन हे पिक हातातून गेले आहे. यामुळे सोयाबीनवर अधिकचा खर्च करण्यापेक्षा त्याला बाजूला सारुन इतर पिकाचे उत्पादन घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

Exit mobile version