शेतकर्‍याने काढली टोमॅटोच्या झाडांची ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक; काय आहे हा प्रकार?

tomato

वाशिम : शेतकर्‍याचा नादच खूळा असे अनेकवेळा म्हटले जाते. याचा प्रत्येय देखील अधून मधून येतच असतो. आता टोमॅटोमधून विक्रमी उत्पन्न मिळाल्याने एका शेतकर्‍याने टोमॅटो उतारई करण्यासाठी चक्क टोमॅटोच्या झाडांची ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढली. एवढेच नाही टोमॅटो झाडे जाळून न टाकता ती पाण्यात विसर्जित केली. टोमॅटोला भाव न मिळाल्यामुळे होणारा लाल चिखल किंवा टोमॅटो फेकून देण्याचे प्रकार अनेकवेळा घडतात मात्र टोमॅटोमधून शेतकर्‍याला विक्रमी उत्पन्न मिळाल्याचे चित्र निश्‍चितच दिलासादायकच आहे.

वाशिम तालुक्यातील देपूळच्या ऋषिकेश गंगावणे यांनी सलग तिसर्‍या वर्षी दीड एकरात टोमॅटोची लागवड केली होती. दरवर्षीच्या नुकसानीमुळे यंदा टोमॅटोचे उत्पादन घटले आणि इकडे बाजारात टोमॅटोचा दर शंभरीपार गेला. विक्रमी दरामुळे खर्च वजा जाता त्यांना ७ लाखाचा निव्वळ नफा झाला. अपेक्षेपेक्षा अधिकचे उत्पन्न मिळाल्यावर शेतकरी काय काय करु शकतो, याचे बोलके चित्र पहालयला मिळाले. दीड एकरात ७ लाखाचा नफा म्हणल्यावर या पिकाची उतराई करण्यासाठी गंगावणे यांनी ढोल-ताशाच्या गजरात टोमॅटोच्या झाडांची मिरवणूक काढली. या उत्पादनामुळेच आपल्या जीवनात बदल झाला आहे त्याची जाणीव ठेवण्यासाठी त्यांनी सबंध गावातून मिरवणूक तर काढलीच पण टोमॅटो झाडांचे पाण्यात विसर्जन केले.

गत दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे कृषि उत्पादनाच मोठी घट झाली होती. यंदाही अनेक पिकांना फटका बसलाच आहे. मात्र कापूस व सोयाबीनसारख्या पिकांना चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान भरुन निघण्यास मदत झाली आहे. असाचा काहीसा प्रकार टोमॅटोबाबतही झाला. गंगावणे यांना टोमॅटोमुळे मोठा आर्थिक फायदा झाला आहे. त्यामुळे मागील दोन वर्षात झालेले नुकसान भरून निघाले आहे.

Exit mobile version