आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार नव्हे तर मिळणार १२ हजार रुपये

pm kisan samman nidhi

मुंबई : पीएम किसान योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकर्‍यांना वर्षाकाठी ६ हजार रुपयांची मदत केली जाते. याच धर्तीवर महाराष्ट्रातील शिंदे सरकारही शेतकर्‍यांना आर्थिक मदत करणार आहे. मुख्यमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत वर्षाकाठी अल्पभूधारक शेतकर्‍यांना ६ हजार रुपये देऊ केले जाणार आहेत. त्यामुळे केंद्राचे ६ आणि राज्याचे ६ असे एकूण १२ हजार रुपये पात्र शेतकर्‍यांना मिळणार आहेत.

केंद्र सरकारने पीएम किसान योजना २०१८ पासून सुरु केली आहे. आता योजनेचा १२ हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होणार आहे. केंद्राची ही योजना सुरु असतानाच याच पद्धतीने राज्य सरकारने मदत करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, त्याच्या नियम आणि अटी काय असणार याबाबत खुलासा केलेला नाही. दरवर्षी शेतकर्‍यांना वर्षकाठी ६ हजार रुपयांची मदत मिळते. ती मदत शेतकर्‍यांच्या थेट बँकेच्या खात्यावर शासनाकडून जमा केली जाते. हीच पद्धत राज्यातही वापरली जाईल अशी शक्यता आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर ही योजना असणार आहे. शिवाय अल्पभूधारक शेतकरी हेच लाभार्थी असून येत्या आर्थिक वर्षातील बजेटमध्ये निधीचीही तरतूद केली जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यापासून प्रत्येक वर्गाला काहीतरी मदत करण्याची भूमिका असल्याने धडक निर्णय घेतले जात आहे. अशातच शेतकर्‍यांना दिलासा मिळावा म्हणून मुख्यमंत्री किसान योजना महत्वाची ठरणार आहे. ही योजना अल्पावधीतच सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, केंद्रप्रमाणे नियम असतील तर पात्र शेतकर्‍यांना त्याचा फायदा लवकर मिळू शकते. या सर्व प्रक्रियेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तत्वतः मान्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी या योजनेला तत्वतः मान्यता दिली असून आता विभागपातळीवर कामही सुरु झाले आहे.

Exit mobile version