शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणजे काय? जाणून घ्या तंत्रशुध्द माहिती

5G technology

नागपूर : बदलत्या वातावरणात शेतकर्‍यांना शून्य मशागत तंत्राने शेती करण्याचा सल्ला दिला जात आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत शेतकर्‍यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी हवामान अनुकूल तंत्रज्ञान अवलंब करण्यास प्रवृत्त देखील करण्यात येत आहे. यामुळे शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणजे नेमके काय? याचा वापर कसा केला जातो? याचा फायदा कसा होतो? असे अनेक प्रश्‍न शेतकर्‍यांना पडत आहेत. यामुळे आज आपण शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणजे काय? याची तंत्रशुध्द माहिती जाणून घेणार आहोत.

मागील काही वर्षातील हवामानातील बदल व पर्जन्यमानातील अनिश्चितता जसे पावसाचे एकूण कमी दिवस, कमी वेळेत जास्त पाऊस, सरासरीपेक्षा कमी पाऊस, पावसाचा तीन आठवड्यांपेक्षा जास्त खंड, मान्सूनचे उशिरा आगमन व वेळेपुर्वी निघून जाणे, गारपीट व अवेळी पाऊस या सर्व हवामानातील बदलामुळे पाणी टंचाई (पिण्यासाठी, जनावरांसाठी, पिकांसाठी) पिकांच्या उत्पादनात व उत्पादकतेत घट, कृषी उत्पादन वाढीचा दर घटणे, अल्प व अत्यल्प भुधारक शेतकर्‍यांमध्ये नैराश्य, ग्रामीण भागाकडून शहराकडे स्थलांतर होऊ लागले इ. परिणाम दिसून येत आहेत. तसेच वाढत्या तापमानामुळे कोरडवाहू पिकाच्या उत्पादकतेवरील परिणाम तसेच जमिनीतील कर्बामध्ये व ओलाव्यामध्ये घट, कमी कालावधीत पडणार्‍या पावसामुळे होणारी प्रचंड जमिनीची धूप, अनियमित पावसामुळे कोरडवाहू पिकाकरीता पाणी उपलब्धतेवर प्रतिकूल परिणाम इ. शेतावर वातावरणातील बदलामुळे संभाव्य दूरगामी परिणाम दिसून येतील असे वातावरण बदलाबाबत कार्यरत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ञांनी नमूद केले आहे.

वरील सर्व दूरगामी परिणामांचा विचार करता बदलत्या वातावरणाचा अभ्यास करून हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रसार व अवलंब करणे आवश्यक आहे. बदलत्या हवामानात जमिनीच्या सुपिकतेचा देखील र्‍हास होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकर्‍यांनी हवामान अनुकूळ असणारी संवर्धित शेती पद्धती अवलंबल्यास जमिनीच्या संवर्धनाबरोबरच उत्पादन खर्चामध्ये लक्षणीय घट होत असल्याचे दिसून आले आहे. संवर्धित शेतीसाठी शून्य मशागत या तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत प्रभावी दिसून आलेला आहे. शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर करून कृषीभूषण चंद्रशेखर हरिभाऊ भडसावळे यांनी सगुणा बाग, तालुका-कर्जत, जिल्हा-रायगड येथे भात पिकासाठी सगुणा राईस तंत्र (एसआर टी) विकसित केले असून सदर तंत्रांची संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृषी संस्थेने नोंद घेतली आहे सदर तंत्राचा राज्याच्या कृषि विभागामार्फत व्यापक प्रसार करण्यात येत आहे.

सदर तंत्राचा अवलंब भाताबरोबरच इतरही पिकांमध्ये फायदेशीर असल्याचा अनुभव शेतकर्‍यांना येत असल्याचे प्रकल्प क्षेत्रामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील शेतीशाळामध्ये आढळून आलेले आहे. प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत असलेल्या शेतीशाळामध्ये सदर तंत्राचा प्रायोगिक तत्वावर अवलंब करण्यात असून खरीप हंगामात कापूस, रबी हंगामात मका आणि त्यानंतर झेंडू पिकाचे यशस्वीपणे उत्पादन घेण्यात आले आहे. पहिल्या वर्षी गादी वाफ्यावर पिकांची लागवड नंतर कोणतीही मशागत नाही आणि त्यानंतर दुसर्या पिकाची लागवड आणि दुसर्‍या पिकाच्या कापणीनंतर पुन्हा मशागत न करता तिसर्‍या पिकाची लागवड अशी शून्य मशागतीची पद्धती असून मागील दोन वर्षामध्ये प्रकल्प गावांमध्ये होती.

शून्य मशागत तंत्रातील महत्वाचे टप्पे
१. गादी वाफा तयार करणे : पहिल्या हंगामात फक्त गादी वाफे तयार करून घ्यावेत. गादी वाफ्याचा आकार ४.५ फुट रुंदी व अर्धाफुट उंची असा असावा.
२. टोकण पद्धतीने लागवड करणे : गादी वाफ्यावर बियाण्याची टोकन करावी. त्यावेळी बियाणे व खते एकत्रपणे टोकावीत.
३. तणनाडकाची फवारणी: पिकाचे लागवडीनंतर व उगवणीपुर्वी शिफारशीत तणनाडक फवारावे. उभ्या पिकात तणांचा प्रादुर्भाव वाढल्यास शिफारस केलेली निवडक तणनाशके वापरावीत. कोणत्याही परिस्थितीत तणे उपटून काढू नयेत.
४. कापणी करून पिकांची काढणी: काढणीच्यावेळी पिके कोणत्याही परिस्थितीत जमिनीतून उपटू नये, तर त्यांची कापणी करावी आणि धसकटे व मुळांचा भाग तसाच ठेवावा.
५. त्याच वाफ्यावर पुढील पिकाची लागवड: पहिल्या हंगामात वाफे न मोडता अगोदरचे पीक कापल्यानंतर तणनाडकाची फवारणी करून पुढील पिकाची टोकन करावी. गरज पडल्यास वाफ्यांची डागडुजी करावी.
६. जमिनीची मशागत न करणे: कोणत्याही परिस्थितीत नांगरणी, कुळवणी, कोळपणी अशा प्रकारची मशागतीची कामे करण्यात येऊ नयेत. शून्य मशागतीमुळे जमिनीमध्ये गांडूळांची वाढ मोठ्या प्रमाणात होत असल्याने आणि सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढल्याने जमिनी भुसभुशीत राहते.

शून्य मशागतीचे फायदे
१. मातीच्या सुपीक थरांमध्ये उलथापालथ होत नाही.
२. सेंद्रिय पदार्थांची मातीमध्ये दीर्घकालीन साठवण होण्यास मदत होते.
३. सातत्याने सेंद्रिय कर्बाची उपलब्धता आणि ओलावा टिकून राहिल्याने मातीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत वाढ होते.
४. पूर्वीच्या पिकाची मुळे जमिनीत राहिल्यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जलद गतीने वाढते.
५. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे रासायनिक खताची बचत होते.
६. विपुल प्रमाणात जमिनीमध्ये गांडूळांचा संचार सुरु होतो.
७. जमिनीत जैविक विविधतेत वाढ होऊन मातीचे आरोग्य सक्षम होते.
८. मातीचे तापमान नियंत्रित राहते.
९. मातीच्या कणांची रचना सुधारते.
१०. जमिनी भेगाळण्याचे प्रमाण कमी होते तसेच जमिनीची धूप कमी होते.
११. मातीमध्ये सच्छिद्रता निर्माण होऊन पिकाच्या मुळाशी वायू आणि पाणी यांचे प्रमाण योग्य राहते.
१२. पावसाचे पाणी भूगर्भात झिरपण्याचे प्रमाण वाढते.
१३. बाष्पीभवन कमी होऊन ओलावा टिकून राहिल्याने उपलब्ध पाण्याचा योग्य वापर होतो.
१४. एकरी रोपांची संख्या नियंत्रित केल्यामुळे बियाण्याची बचत होते.
१५. पिकावर रोग किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
१६. मशागत खर्च कमी होऊन उत्पादन खर्चामध्ये मोठी बचतं होते.
(साभार : महाराष्ट्र कृषी विभाग)

Exit mobile version