उत्तर महाराष्ट्रातील जी.आय. मानांकित पिके आणि त्यांचे वेगळेपण

crope

जळगावची केळी
जळगाव जिल्ह्यातील केळीला केवळ राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील मोठी मागणी असते. येथील केळीची सर्वात वेगळे वैशिष्ट म्हणजे चव! जळगाव जिल्ह्यातील केळीला वेगळाच गोडवा आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर, चोपडा, यावल व भुसावळ या तालुक्यातील केळीसाठीचे आवश्यक उत्तम हवामान हे एक प्रमुख कारण आहे. तापी नदीवरील हातनूर धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या क्षेत्रावर केळीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मुबलक प्रमाणतील भूगर्भातील पाण्याची उपलब्धता, नत्राचे व पालाशचे जास्त प्रमाण असलेल्या व गाळाच्या सपाट जमिनी व मेहनती शेतकरी यांमुळे येथे केळीचे क्षेत्र वाढले आहे व परिणामी उत्पादकताही वाढलेली आहे. महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात (४५ हजार एकर क्षेत्रावर) केळीची सर्वाधिक लागवड होते.

जळगावचे भरताचे वांगे
भरीत तयार करण्यासाठी लागणार्‍या वांग्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातील भरताच्या वांग्यांची बातच निराळी आहे. जळगावच्या वांग्यामध्ये बियांचे प्रमाण कमी असते. या वांग्याचा आकार पारंपरिक वांग्यापेक्षा चारपट मोठा असतो. जळगावमधील वांग्याचा आकार अंडाकृती असतो, तर रंग लांब, पिवळसर हिरवा असून त्यावर पांढर्‍या रेषा असतात. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, यावल, जळगाव (जळगाव तालुक्यातील आसोदा, ममुराबाद, भादली व भालोद ही गावे) हे तालुके भरताच्या वांग्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. विशेषतः बामनोद (ता. यावल) हे गाव मोठ्या आकाराच्या भरीत वांग्यासाठी प्रसिद्ध आहे. जळगाव जिल्ह्यात भरताच्या वांग्याची लागवड नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत केली जाते. या कालावधीत भरताच्या वांग्यासाठी लागणारे उत्तम हवामान मिळते. जळगाव जिल्ह्यातील हवामान, जमीन व पर्जन्यमान या गोष्टी वांग्याच्या लागवडीस योग्य आहेत.

नाशिकचे द्राक्षे
नाशिकची द्राक्षे मोठ्या प्रमाणात निर्यात होतात. नाशिकमधील द्राक्षांचे घड आकर्षक व शंकूच्या आकाराचे असतात. द्राक्षाचा घड मोकळा दिसत असला, तरी तो पूर्णपणे भरलेला असतो. फळे मोठी आणि लांबट आकाराची असतात. घडाची त्वचा मऊ, फळे कुरकुरीत, आकर्षक व रसदार आणि कमी बियाणे असलेली असतात. घडाचे वजन ३५० ते ५०० ग्रॅम असते. द्राक्षांसाठी जमिनीत असावे लागणारे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, सल्फर, आयर्न, मँगनीज, झिंक असे सर्व घटक पुरेशा प्रमाणात नाशिकमधील जमिनीत आढळतात. येथील मातीतील सामू ६.५ ते ७.५ इतका आहे. नाशिकमधील नोव्हेंबर महिन्यात असणारे कमी तापमान द्राक्षांना मानवते आणि फळांना आवश्यक असे अ‍ॅसिडचे अधिक प्रमाण आणि आर्द्रतेचे कमी प्रमाण यांमुळे वाइनसाठी अत्यंत उपयोगी अशी द्राक्षे तयार होतात.

नाशिक व्हॅली वाइन (दिंडोरी, जि. नाशिक)
नाशिक जिल्ह्यातील हवामान, वातावरण व इथल्या तांबड्या मातीमुळे वाइनसाठी चांगल्या प्रतीची द्राक्षे उपलब्ध होऊ शकतात. द्राक्षांचे भरपूर उत्पादन होत असल्याने येथे वाइनसाठी द्राक्षावर चांगली प्रक्रिया करणार्‍या कारखान्यांची उपलब्धता हे येथील वैशिष्ट्य आहे. दिंडोरी वाइन कॅबरनेट, सुवीग्नॉन, सीराज, सुवीग्नॉन ब्लँक व रेजलिंग या जातींपासून तयार केली जाते. व्हाइट वाइन व रेड वाइन असे तिचे दोन प्रकार आहेत. या वाइनला एका विशिष्ट चवीबरोबरच विशिष्ट रंगही प्राप्त होतो, तो तेथील भौगोलिक स्थानामुळे. दिंडोरी वाइन ही उत्साह वाढण्यासाठी, सुंगधासाठी व स्वादासाठी प्रसिद्ध आहे.

लासलगावचा लाल कांदा (ता. निफाड, जि. नाशिक)
लासलगावच्या कांद्याच्या जातीस निफाड रेड, नाशिक रेड, लासलगाव लाइट रेड असेही म्हटले जाते. गर्द लाल रंग, तिखट चव, टिकाऊपणा व मोठा आकार यांमुळे येथील कांदा प्रसिद्ध असून मार्केटमध्ये त्याला इतर कांद्यांच्या तुलनेत अधिक मागणी असते. हा कांदा रब्बीमध्ये लावला जातो. या कांद्याच्या बाहेरच्या बाजूने १६ ते १७ वाळलेले पापुद्रे असल्याने आतील कांदयाला चांगले संरक्षण मिळते. या कांद्यामध्ये निर्जल पदार्थाचे प्रमाण जास्त असल्याने इतर वाणांपेक्षा तो जास्त दिवस साठवता येतो. लासलगावचे हवामान, जमिनीच्या प्रकारामुळे येथील कांदा चांगल्या प्रतीचा असतो. लासलगावमधील काळ्या जमिनीत अ‍ॅल्युमिनिअम, कॅल्शिअम कार्बोनेट, मॅग्नेशिअम ह्यांचे प्रमाण जास्त आणि नत्राचे व स्फुरदाचे प्रमाण कमी असून या जमिनी मध्यम-अल्कली आहेत. त्यामुळे येथे कांद्याचे जास्त उत्पादन मिळते.

Exit mobile version