तणनाशकांमुळे गणपतीच्या दुर्वांवर विघ्न

ganapati-bappa's-durva-is-in-trouble-due-to-herbicide

जळगाव : गणेशोत्सवात दुर्वाला प्रचंड मागणी असते. दुर्वा गवत ही भारतातील एक पवित्र वनस्पती मानली जाते. कारण दुर्वा गवताने गणेशाची पूजा केली जाते. मात्र गणेश उत्सवासाठी लागणार्‍या दुर्वा अर्थात हराळीच्या जुडीसाठी सध्या मोठे प्रयास करावे लागत असल्याचे दिसून येत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे, शेतीत तणनाशकांचा अति वापर! आता अनेकांना प्रश्‍न पडला असेल की, गणपतीची दुर्वा आणि तणनाशकांचा काय संबंध आला?

शेताच्या बांधावर, पडीक जमिनीवर तसेच पाण्याच्या पाटाच्या कडेला आणि परस बागेतही दूर्वा (हराळी) मोठ्या प्रमाणावर येत असे. दुर्वा हे गवत जमिनीवर रेंगाळते आणि जेथे नोड जमिनीला स्पर्श करते तेथे मुळे येतात आणि दाट चटई तयार होते. दुर्वा गवत बियाणे आणि राइझोमद्वारे पुनरुत्पादित होते. हे आयुर्वेदिक औषधांमध्ये पारंपारिक औषधी वनस्पती म्हणून वापरले गेले आहे, ज्याला आयुर्वेदात औषधी तसेच नैदानिक गुणांमुळे खूप महत्त्व आहे. तिचा वापर गणेशोत्सव तसेच संकष्टी चतुर्थीला पूजेसाठी म्हणून केला जातो तर गणेशोत्सव काळात दुर्वांच्या जुडीला महत्त्वाचे स्थान असते. मात्र मागील काही वर्षापासून मोठ्या प्रमाणावर शेतातील तणनाशकांचा वारेमाप वापर होत असल्याने शेतात बांधावर दूर्वा मिळणे अवघड झाले आहे.

हराळी हे खोलवर जाणारे तण असल्याने तिचा बंदोबस्त करण्यासाठी तणनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आधुनिक, प्रगत शेती करण्याच्या हव्यासापोटी शेतकरी तणनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर करू लागले आहे. हे आता नवे राहिलेले नाही. मात्र या तणनाशकांमुळे पिकांना तर धोका असतोच शिवाय अनेक वनस्पती नष्ट होत आहेत. हराळी अर्थात दुर्वांबाबत हेच समीकरण लागू होते. वाढत्या तणनाशकांच्या वाढणार्‍या वापरामुळे हराळीचे प्रमाण मात्र कमी होत आहे.

Exit mobile version