कापूस आणि सोयाबीनचे उत्पादन वाढविण्यासाठी सरकारचा ‘हा’ आहे प्लॅन

Soybean and cotton

पुणे : शेतकर्‍यांचे उत्पादन वाढीच्या दृष्टीने कापूस आणि सोयाबीन ही पिके महत्वाची आहेत. या दोन्ही पिकांचे उत्पादन वाढावे यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. सरकारच्या नव्या कृती योजनेअंतर्गत आगामी ३ वर्षात या दोन्ही पिकांचे उत्पादन वाढणार त्यादृष्टीने धोरण आखण्यात आले आहे. योग्य तंत्रज्ञानाचा वापर, शिवाय शेतकर्‍यांना मार्गदर्शन यासारखे उपक्रम राबवण्यासाठी या विशेष कृती योजनेस ३ वर्षासाठी १ हजार कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पातच खरीप हंगामातील पिकांची उत्पादकता वाढवण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार खरिपातील कापूस, सोयाबीन, भुईमूग, सुर्यफूल, करडई, मोहरी आणि तीळ या तेलहबियांची उत्पादकता वाढवणे त्याच बरोबर मूल्यसाखळी विकासासाठी ३ वर्षासाठी विशेष कृषी योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये १ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामधील ६० टक्के निधी हा केवळ कापूस आणि सोयाबीनवरच खर्ची केला जाणार आहे. या योजनेस राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यताही देण्यात आली आहे.

या योजनेत उत्पादनवाढीसाठी शेतकरी जे प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करतात तेच तंत्रज्ञान इतर शेतकर्‍यांना द्यावे लागणार आहे. कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेले तंत्रज्ञान शेतकर्‍यांना पोहचवले जाणार, गावनिहाय शेतकर्‍यांचे गट तयार करुन त्यांना पीक प्रात्याक्षिके करुन दाखविले जाणार आहेत. शेती शाळा, क्षेत्रीय भेटी या माध्यमातून उत्पादन तंत्रज्ञान पोहचविले जाणार आहेत.

Exit mobile version