आजीबाईंच्या शेतातील चमत्कार राज्यभरात चर्चेचा विषय; वाचा काय आहे…

ratal

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे एका शेतामधून तब्बल सात किलो वजानाचं रताळं जमीनीबाहेर काढण्यात महिला शेतकऱ्याला यश आलंय. या रताळ्याच्या एवढ्या वजनामुळे राज्यात त्याची चर्चा होते आहे. हा निसर्गाचा चमत्कार सावरगावतळ येथील हिराबाई नेहे या आजीबाईंच्या शेतात झाला आहे.

हिराबाई नेहे नैसर्गिक शेती आणि बियाणे बँकेचे काम करतात. सेंद्रिय वाणांचे संवर्धन, प्रसार, आरोग्यदायी भाज्यांची लागवड यावर त्यांचा भर आहे. विविध प्रकारच्या 50 वाणांचे त्यांनी जतन केले आहे. हे बियाणे तीन ते चार वर्षे टिकते. त्या जतन केलेल्या बियाण्यांचे कुटुंबाबरोबरच इतरांनाही अनेक वर्षांपासून गरजेनुसार मोफत वाटप करतात.

हिराबाई नेहे यांचे शेत अतिशय हलक्या प्रतीचे म्हणजेच मुरमाड प्रकारची माती असणारं असून मागील वर्षीच्या खरीपाच्या हंगामात ऑगस्ट महिन्यात त्यांनी कांद्याचं पीक लावले होते. त्या पिकाच्या कडेला त्यांनी हा रताळ्याचा वेल लावला होता. मात्र हा वेल लावल्यानंतर कांद्याचं पिक येऊन गेल्यानंतर त्याच्याकडे फारसं लक्ष देण्यात आलं नाही. या शेतामध्ये तीन ते चार महिन्यापासून कोणतेही पीक घेण्यात आलं नाही. त्यामुळे शेताला पाणी देण्याचा प्रश्नच नव्हता. तरीही या वेलीला एकच अवाढव्य रताळं आलं. वेल काढताना तिला जमिनीत एकच सात किलो वजनाचे रताळयाचे कंद आल्याचं हिराबाईंच्या लक्षात आलं.

सावरगाव तळ हे पूर्वी रताळ्याचे गाव म्हणून प्रसिद्ध होते. रताळ्यासाठी पोषक असलेली जमीन त्या गावात आहे. कोणत्याही प्रकारचे खत नाही, औषध नाही, तरीही वजनदार रताळे निघाल्याचे त्यांनी सांगीतले.

रताळ्याच्या एवढ्या वजनामुळे राज्यात त्याची चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे या वेलीला कोणत्याही प्रकारचे खत, औषध किंवा चार महिन्यापासून पाणी सुद्धा दिलेले नसतांना एवढ्या मोठ्या आकाराचं रताळं या वेलीला आल्याने आता या सात किलोच्या रताळ्याची चर्चा राज्यभरात होऊ लागली आहे.

Exit mobile version