अ‍ॅग्री बिझनेसची भन्नाट आयडीया असेल तर तुम्हाला मिळतील २५ लाख रुपये

indian currency

नवी दिल्ली : भारत हा कृषीप्रधान देश असून या क्षेत्रात अपार क्षमता आहे. तरुणांनी कृषी क्षेत्राकडे वळावे यासाठी केंद्र सरकारसह सर्व राज्यातील सरकारे प्रयत्न करतांना दिसत आहेत. याच अनुषंगाने कृषी क्षेत्रातील मजबूत व्यावसायिक कल्पना घेऊन येणार्‍या तरुण, शेतकरी आणि उद्योजकांना २५ लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय हरियाणा सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे देशातील कोणताही नागरिक यासाठी अर्ज करु शकतो.

हरियाणाचे मनोहर लाल खट्टर सरकार चौधरी चरणसिंग हरियाणा कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने ही सुविधा देत आहे. तरुण आणि शेतकर्‍यांमध्ये कृषी कौशल्ये वाढवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमांतर्गत शेतकर्‍यांना राज्य सरकारकडून स्टार्टअप्सबाबत दोन महिन्यांचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे, जेणेकरून शेतकरी कृषी क्षेत्रात मूल्यवर्धन, प्रक्रिया, सर्व्हिसिंग, पॅकेजिंग आणि ब्रँडिंग करू शकतील.

कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे आणि रोजगार निर्मिती करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. तरुण आणि उद्योजकांनी या क्षेत्रात नवीन व्यवसाय कल्पना घेऊन पुढे यावे, ज्यामुळे कृषी क्षेत्रात नवीन शक्यता निर्माण होतील, अशी सरकारची इच्छा आहे. तुम्हाला सरकारच्या या योजनेत सामील व्हायचे असेल तर तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल अ‍ॅग्रीकल्चर, अ‍ॅग्रो प्रोसेसिंग, वेस्ट टू वेल्थ, डेअरी, फिशरीज यांसारख्या श्रेणींमध्ये सुरू करू शकता.
असा अर्ज करा : तुम्हाला सरकारच्या या उपक्रमात स्वारस्य असल्यास, तुम्ही www.hau.ac.in वेबसाइट वर ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करू शकता.

Exit mobile version