खान्देशात पावसाचा कहर; हातातोंडाशी आलेले घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल

untimely-rain

जळगाव : जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला होता. त्यात पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या संकटातून कसेबसे सावरत असलेल्या पिकांवर सप्टेंबर महिन्यात तिसर्‍या आठवड्यापासून होत असलेल्या मुसळधार पावसाने पाणी फेरले आहे. गत खान्देशासह राज्यातील अनेक भागांमध्ये गत आठवड्यापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पिकं भुईसपाट झाली आहेत. सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकर्‍यांच्या शेतात पावसाचे पाणी साचल्याने शेती पिके करपू लागली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. त्याचबरोबर संततधार पावसामुळे कापूस, मका, खडी, मूग, उडीद, मिरची ही पिके नष्ट झाली असून, त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

१८ व १९ सप्टेंबर रोजी गिरणा नदी काठच्या तालुक्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. चाळीसगाव, पाचोरा व भडगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. यासह जळगाव शहरासह तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे परिसरातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सततच्या पावसाचा परिणाम शेती पिकांवर दिसून येत आहे. पिके पिवळी पडल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. दरम्यान, या महिन्यात अजून पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आणखी पावसाच्या शक्यतेने शेतकरी संकटात सापडला आहे. पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शासनाकडे भरपाईची मागणी करत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

धुळ्यात पाणीच पाणी
धुळे शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. तर काल सायंकाळी व रात्री देखील शहरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील देवपूरासह अनेक भागांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. पांझरा नदीसह नाल्यांना देखील पूर आलेला आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. धुळे शहरात रात्रभर झालेल्या अतिवृष्टीमुळे व निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती यांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धुळे महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळांना दि.१९ सप्टेंबर रोजी एक दिवसाची सुट्टी देण्यात येत असल्याचे शिक्षणाधिकारी (माध्य) व प्राथमिक जिल्हा परिषद, धुळे यांनी जाहीर केले आहे.

शेतकर्‍यांना अशी मिळू शकते आर्थिक मदत
अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे हातचे पीक गेले आहे. त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या संकटात प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मदतीचा हात मिळू शकतो. यासाठी शेतकर्‍यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. या योजनेतंर्गत आवर्षण, अवकाळी पाऊस, बेमौसमी पाऊस, पूर आदींमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात येते. ज्या शेतकर्‍यांनी विमा योजनेत नोंदणी केली आहे त्यांना भरपाई मिळते. नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना कंपनीला याची माहिती द्यावी लागेल. त्यासाठी ७२ तासांचा कालावधी देण्यात आला आहे. त्याच काळात विमा कंपनीला कळवावे लागेल. पंचनामा झाल्यानंतर अंदाजित नुकसानीचा आकडा नोंदवण्यात येतो. पिकांचे किती नुकसान झाले याचा अंदाज बांधण्यात येतो. भरपाईची रक्कम तुमच्या खात्यात थेट जमा करण्यात येते.
देशातील शेतकरी किसान पीएम फसल बीमा योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी शेतकर्‍यांना अर्ज करावा लागतो. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने हा अर्ज करता येतो. शेतकर्‍यांना ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास त्यांना या योजनेचे संकेतस्थळ, https://pmfby.gov.in ला भेट द्यावी लागेल. याठिकाणी सर्व विहित प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. तर ऑफलाईन अर्ज जवळच्या बँक, सहकारी बँका, कॉमन सर्व्हिस सेंटर (उडउ)या ठिकाणी उपलब्ध आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी पेरणीच्या १० दिवस अगोदर अर्ज सादर करावा लागतो. या योजनेत सहभागी होण्यासाठी राशन कार्ड, बँक खाते, आधार क्रमांक आवश्यक आहे. पासपोर्ट फोटो, शेतीचा खासरा क्रमांक, रहिवाशी दाखला (वाहन परवाना, मतदान ओळखपत्र), आदी कागदपत्रांचा यामध्ये समावेश आहे.

Exit mobile version