नाशिकला पावसाची दमदार हजेरी; शेती कामांना वेग

heavy-rain-with-thunder

Photo credit : Telegraph India

नाशिक : शेती मशागतीची कामे आटोपून बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले असतानाच नाशिक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. उशिरा का होईना दणक्यात पाऊस झाल्याने आता खरीप हंगामातील कामांना अधिक वेग येणार आहे. बहुप्रतिक्षित पावसाच्या आगमनानंतर शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

8 जून उजाडला तरी राज्यात सर्वत्र पाऊस झालेला नाही. मध्यंतरी मराठवाड्यातील लातूर, परभणी, औरंगाबाद जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. गत आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, बार्शी या ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र, अद्यापही पाऊस हा सक्रीय झालेला नाही. तुरळक ठिकाणीच तो बरसत असून पावसाच्या या लहरीपणामुळे शेतकरीही संभ्रमात आहे. किमान १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय चाढ्यावर मुठ न ठेवण्याचे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले असल्याने राज्यात अद्यापही पेरण्यांना वेग आलेला नाही.

यंदा मान्सूनचे वेळेपूर्वीच आगमन होणार असल्याचे सांगण्यात आल्याने शेतकर्‍यांनी शेती मशागतीची कामे वेळेत पूर्ण केली होती. मात्र पावसाचे आगमन लांबले, परंतू आता नाशिक जिल्ह्यात पावसाच्या दमदार हजेरीमुळे शेतकरी सुखावला आहे. गत दोन दिवसांपासून शेतशिवार देखील गजबजलेले दिसून येत आहेत. पुढच्या दोन-तिन दिवसात पेरण्यांचा वेग येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Exit mobile version