पिकांना विशिष्ट असे जी.आय.मानांकन कसे व का मिळते? वाचा सविस्तर

farmer 1

पुणे : जेव्हा एखादा शेतकरी समूह एखाद्या पिकाची लागवड करतो किंवा एखादा पदार्थ बनवतो तेव्हा त्याला तेथील भौगोलिक परिस्थितीनुसार काही गुणधर्म वैशिष्ट्ये मिळालेली असतात. त्यामुळे त्या पिकांची किंवा उत्पादनाची विशेष गुणवत्ता निर्माण होते. तेथील हवामान, माती आणि पाणी याचा त्या उत्पादनावर परिणाम झालेला असतो त्यामुळे या उत्पादनाला एक वैशिष्ट्य प्राप्त झालेले असते. त्यांना भौगोलिक चिन्हांकन(जी.आय.मानांकन) दिले जाते. महराष्ट्रात २६ कृषि उत्पादनांना जी.आय.मानांकन प्राप्त झाले आहे.

जी.आय. मानांकन मालास निर्यातीसाठी अधिक संधी उपलब्ध होतात अशा नोंदणी करत कृषि मालास राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँड होण्यास मदत होते. व्यापारी चिन्हाला बाजारपेठेत जे महत्त्व असते तेच महत्त्व कृषि मालाच्या जी.आय. मानांकन असते. त्यामुळे असे नोंदणी केलेल्या उत्पादनाच्या उत्पादकाला जास्तीचे आर्थिक उत्पन्न मिळून त्याच्या उन्नतीस हातभार लागतो.

कोणताही नोंदणीकृत व्यक्तीसमूह किंवा उत्पादन संघटना जी त्या उत्पादनाच्या उत्पादकाशी संबंधित असेल फक्त तेच ह्याची नामांकन नोंदणीसाठी अर्ज करू शकतात. संबंधित कार्यक्षेत्रात उत्पादित होणार्‍या सर्व कृषि मालासाठी ह्याचा फायदा घेता येतो कारण सदरचा बौद्धिक संपदा ही सामूहिक हक्काची असते, याची वैयक्तिक स्वरूपात नोंदणी करता येत नाही. अर्जदार, संस्था कोणीही असली तरी त्या पिकाच्या भौगोलिक क्षेत्रांमधील इतर शेतकर्‍यांना सुद्धा या नोंदणीचा अधिकृत वापरकर्ता म्हणून फायदा घेता येतो.

जी.आय मानांकनासाठी आवश्यक कागदपत्रे
१) भौगोलिक चिन्हांकित पिकाकरिता अधिकृत वापरकर्ता म्हणून नोंदणी करण्याकरिता ०१- ३४ मध्ये अर्ज करणे आवश्यक.
२) अर्जासोबत सातबाराची स्वयंसाक्षांकित प्रत तसेच सदर पिकाची ट्रेसिअबिलिटी नेट अंतर्गत नोंदणी केली असल्यास नोंदणीची प्रत.
३) भौगोलिक चिन्हांकन नोंदणीकृत कार्यक्षेत्रातील पिकाचे उत्पादक असल्याचे व त्या दर्जाचे उत्पादन घेत असल्याबाबतचे शेतकर्‍याचे हमीपत्र
४) त्या संस्थेच्या नावाने ज्या पिकाकरिता भौगोलिक चिन्हांकन प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे त्या संस्थेचे संबंधित शेतकर्‍यांच्या नावाने अधिकृत वापरकर्ता म्हणून नोंदणी करण्याकरिता शिफारस पत्र
५) अधिकृत वापरकर्ता नोंदणी करण्यासाठी निर्धारित केलेली फी डीडी किंवा चेकद्वारे रजिस्टर, जिओग्राफिकल इंडिकेशन, चेन्नई यांच्या नावे भरणे आवश्यक.

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता :
रजिस्टार जिऑग्राफिकल इंडिकेशन
रजिस्ट्री ऑफिस, इंटलेक्च्युअल प्रॉपटी इंडिया बिल्डिंग,
जीएसटी रोड चेन्नई, पिन कोड नंबर ६०००३२, ऑफिस नंबर
४४-२२५० २०९२

Exit mobile version