मक्यावरील लष्करी अळीचे व्यवस्थापन कसे करावे?

maka

मक्यावर गेल्या २ वर्षांपासून नवीन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. ही बहुभक्षी कीड आहे. ही कीड १८६ च्या वर तृणधान्ये, तेलवर्गीय, भाजीपाला पिके, गवत इत्यादीवर उपजीविका करते. ही कीड प्रामुख्याने मका, भात, ज्वारी, ऊस व बर्म्युडा गवत यावर प्रामुख्याने प्रादुर्भाव करते. याशिवाय सोयाबीन, कापूस, भुईमूग, कांदा, टोमॅटो, कोबीवर्गीय भाजीपाला, भोपळावर्गीय भाजीपाला इत्यादी पिकावर उपजीविका करते. याचा प्रसार होण्याचा वेग खूप जास्त असतो. यामुळे ही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते.

अशी ओळखा लष्करी अळी
पतंग : नर पतंगाचे समोरचे पंख करड्या व तपकिरी रंगाचे असून पंखाच्या टोकाकडे व मध्यभागी पांढरे ठिपके असतात. मादी पतंगाचे समोरचे पंख पूर्णपणे करड्या रंगाचे असतात. नर-मादी पतंगाचे मागील पंख चमकदार पांढरे असतात. पतंग निशाचर असून संध्याकाळी मीलनासाठी जास्त सक्रिय असतात.
अंडी : अंडी पुंजक्यात घातली जातात. अंडी घुमटाच्या आकाराची, मळकट पांढरी ते करड्या रंगाची असतात. ही अंडीपुंज केसाळ आवरणाने झाकलेली असतात.
अळी : पूर्ण वाढलेली अळी ३.१ ते ३.८ सें.मी. लांब असते. अळीचा रंग फिकट हिरवा ते जवळपास काळा असतो. पाठीवर फिकट पिवळ्या रंगाच्या तीन रेषा असतात. तसेच शरीरावर काळे ठिपके असतात. मागच्या बाजूने दुसर्‍या वलयावर चौरसाच्या आकारात चार काळे ठिपके असतात.

नुकसानीचा प्रकार
लष्करी अळीचा प्रादुर्भाव मका पिकावर सर्व अवस्थेत आढळून येतो. या किडीची अळी अवस्था पिकांना नुकसान पोहचवते. सुरुवातीच्या अवस्थेतील अळ्या पानाचा हिरवा भाग खरवडून खातात. त्यामुळे पानावर पांढरे चट्टे दिसतात. मोठ्या अळ्या पाने कुरतडून खातात. त्यामुळे पानांना छिद्रे दिसतात. अळी पोंग्यामध्ये शिरून आत खाते. पानांना छिद्रे व पोंग्यामध्ये अळीची विष्ठा ही चिन्हे या अळीच्या प्रादुर्भावाची आहेत. या किडीच्या प्रादुर्भावामुळे ३० ते ६० टक्क्यापर्यंत उत्पादनात घट येते. पावसाळ्यात सर्वात जास्त पतंग आढळतात. ओलिताखालील पिकात कमी प्रादुर्भाव आढळतो.

कामगंध सापळ्याचा वापर
एक एकर क्षेत्र निवडावे. त्यात ५ कामगंध सापळे लावावेत. शेताच्या कडेच्या काही ओळी सोडून आत हे सापळे लावावेत. सापळ्यात आकर्षित झालेल्या पतंगाची दर आठवड्याला नोंद करावी. कामगंध सापळ्यामुळे या किडीच्या प्रादुर्भावाची सुरुवात कळते. त्यानुसार तिचे व्यवस्थापन करावे.

फवारणीसाठी कीटकनाशके
रोपावस्था ते सुरुवातीची पोंग्याची अवस्थेतील (अंडी अवस्था) ५ टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडावर निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अ‍ॅझाडीरॅक्टिन १५०० पीपीएम १० लिटर पाण्यात ५० मिली फवारावे.
मध्यम ते शेवटची पोंग्याची अवस्थेतील (दुसर्‍या व तिसर्‍या अवस्थेतील अळ्या) १० ते २० टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडांवर इमामेक्टीने बेंझोटेट ५ टक्के डब्ल्यूजी ४ ग्रॅम किंवा स्पिनोसॅड ४५ टक्के एससी ३ मि.ली.प्रति १० लीटर पाणी किंवा थायामिथॉक्झाम १२.६ टक्के + लॅमडा साहॅलोथ्रिन ९.५ टक्के झेडसी ५ मि.ली.प्रति १० लीटर पाणी किंवा क्‍लोरनट्रानिलीप्रोल १८.५ टक्के एससी ४ मि.ली.प्रति १० लीटर पाणी या प्रमाणात फवारावे.
शेवटच्या १० ते २० टक्के भुसा व अवस्थेतील अळ्यांवर विषारी आमिषाचा वापर करावा. यासाठी १० किलो साळीचा २ किलो गूळ प्रादुर्भावग्रस्त झाडे २ ते ३ लीटर पाण्यात मिसळून २४ तास सडण्यासाठी ठेवावे. वापर करण्याच्या अर्धा तास अगोदर यामध्ये १०० ग्रॅम थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूजी मिसळावे. हे विषारी आमिष पोंग्यामध्ये टाकावे.

Exit mobile version