यंदा पाऊस समाधानकारक तरीही कृषीमंत्र्यांचा शेतकर्‍यांसाठी महत्वाचा सल्ला

india-farmer

फोटो प्रतीकात्मक

मुंबई : ५ जून रोजी तळकोकणात पावसाचे आगमन झाल्यानंतर दोन ते तीन दिवसात मान्सूनचा पाऊस राज्यात सर्वदूर पसरेल, असे भाकित भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ वैज्ञानिक कृष्णानंत होसाळीकर यांनी वर्तविले आहे. यंदा ९९ टक्के पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला असला तरी पुरेसा पाऊस होण्याआधी पेरणीची घाई करु नका, असे आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केले आहे.

मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे. यामुळे पेरणीपुर्व तयारीला वेग आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा समाधानकारक पाऊस होणार आहे. यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पावसाच्या वर्दीमुळेच भारावरलेल्या शेतकर्‍यांनी पेरणीची तयारी देखील सुरु केली आहे. मात्र पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नका, असे आवाहन कृषीमंत्र्यांनी केले आहे.

दरवर्षी सर्वसाधारणपणे ७ जूनला महाराष्ट्रात येणारा मान्सूनचा पाऊस यंदा ५ जूनला राज्यात दाखल होणार आहे. त्याआधी पूर्वमोसमी पावसाने कोकणासह मराठवाड्यासह पश्‍चिम महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्रात जोरदार सलामी दिली आहे. मात्र या पावासामुळे अखेरच्या टप्प्यातील आंब्यासह भुईमुगाचे नुकसान होणाची शक्यता आहे.

पहिल्या पावासानंतर शेतकरी पेरणीची घाई करतात. मात्र यामुळे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. गत चार-पाच वर्षांचा अनुभव लक्षात घेता पावसात खंड पडल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवते. यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता असते. यामुळे यंदा पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरण्या न करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

उत्पदनात वाढ आणि दुबार पेरणीचे संकट टाळायचे असेल तर शेतकर्‍यांनी पुरेसा म्हणजेच १०० मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्यावरच चाढ्यावर मूठ ठेवण्याचा सल्ला दिला आहे. राज्याची खरीप हंगामपूर्व बैठक झाल्यानंतर त्यांनी हे विधान केले आहे. शिवाय राज्यात सोयाबीन आणि कापसाचेच क्षेत्र यंदा वाढणार हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी पोषक वातावरणाचा फायदा घेण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

Exit mobile version