१०० मिमि पाऊस झाल्याशिवाय शेतकर्‍यांनी चाढ्यावर मूठ ठेऊच नये; कृषिमंत्र्यांचा शेतकर्‍यांना महत्वाचा सल्ला; जाणून घ्या सविस्तर

rain 1

नाशिक : मे महिना अर्धा उलटत आल्याने आता सर्वत्र खरिपाची तयारी सुरु झाली आहे. यंदा मान्सूनचे आगमन १० दिवस आधी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण आहे. याच पार्श्‍वभूमीवर कृषीमंत्री दादा भूसे यांनी शेतकर्‍यांना एक महत्वाचा सल्ला दिला आहे.

शेतकरी एखादा पाऊस झाला की, चाढ्यावर मूठ ठेवण्याच्या तयारीत असतो. मात्र, पुन्हा पावासाने ओढ दिली तरी दुबार पेरणी ही ठरलेलीच आहे. याचा अनुभव दरवर्षी शेतकर्‍यांना येत असतो. त्यामुळे किमान १०० मिमि पाऊस झाल्याशिवाय शेतकर्‍यांनी चाढ्यावर मूठ ठेऊच नये. शिवाय पेरणीपूर्वी कृषी अधिकार्‍यांचा सल्ला देखील घ्यावा, असे आवाहन कृषीमंत्र्यांनी केले आहे.रासायनिक खतांच्या बाबतीतही कृषीमंत्र्यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे. ते म्हणाले की, यंदा रासायनिक खताचा तुटवडा भासेल अशी अफवा पसरवली जात आहे. जेणेकरुन खताचे दर वाढून मध्यंस्तींना त्याचा फायदा होईल. पण शेतकर्‍यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही.

खरिपासाठी राज्याने केंद्राकडे ५२ लाख मेट्रीक टन खताची मागणी केली आहे. ४५ लाख मेट्रिक टन आवनटन केंद्राने मंजूर केले आहे. दर महिन्याला त्यात्या वेळे प्रमाणे, खत मे जून जुलै या तीन महिन्यात उपलब्ध करून द्यावी अशी मागणीही राज्याच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना खत, बी-बियाणांचा तुटवडा भासू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. खरीप हंगामासाठीचे पीक कर्ज वितरणास सुरवात झाली आहे. या कर्जावर खरिपाचा खर्च निघेल. शिवाय शेतकर्‍यांना ऐन गरजेच्या वेळी ही रक्कम पदरी पडणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या ठेवी ज्याप्रमाणे ठेऊन घेतल्या जातात त्याच प्रमाणे कर्जाचेही वितरण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

Exit mobile version