भाजीपाला रोपवाटीका तयार करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

bhajipala

पुणे : भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो, वांगी, मिरची, ढोबळी मिरची, कांदा, ब्रोकोली, नवलकोल, फुलकोबी इत्यादी पिकांची रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करतात. त्यासाठी रोपवाटिकेमध्ये रोपांची काळजी कशी घ्यावी, रोपवाटिकेसाठी जागेची निवड कोठे व कशी करावी, रोपवाटिकेमध्ये रोपांचे पीकसंरक्षण आणि लागवडीपूर्वी रोपांना करावयाची प्रक्रिया इत्यादी बाबी महत्वाच्या असतात. याच अनुषंगाने आज आपण रोपवाटीका व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

रोपवाटीका तयार करतांना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, रोपावाटिका तयार करण्यासाठी जमीन कशी निवडावी? हा मुख्य प्रश्‍न असते. तज्ञांच्या शिफारशीनुसार, रोवाटिकेसाठी निवडलेली जागा चांगली निचरा होणारी असावी कारण जर येथे पाणी साचून राहिले तर रोपवाटिकेचे नुकसान होवू शकते. रोपांच्या जलद वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. याची काळजी जागेची निवड करतांना घ्यावी. निवडलेल्या जागेची जमीन सुपीक आणि रोगकिडीच्या प्रादुर्भावापासून मुक्त असावी. निवडलेल्या जागेचा सामू शक्यतो ७.० असावा.

रोपवाटिकेसाठी वाफा कसा तयार करावा?
रोपवाटिकेसाठी शक्यतो गादी वाफा तयार करावा. परंतु रब्बी हंगामात रोपवाटिका सपाट वाफ्यावर केली तरी चालते. रोपबाटिकेमध्ये गादी वाफा शक्यतो ३ बाय २ मीटर लांबी-रुंदीचा तयार करावा. त्यांची उंची १५ सें.मी. ठेवावी. तसेच दोन वाफ्यामध्ये ३० ते ४० सें.मी. मोकळी जागा ठेवावी, की ज्यामुळे रोपवाटिकेमध्ये खुरपणी किंवा निंदणी करणे सोपे जाते. गादी बाफे तयार केल्यानंतर बियाणांची पेरणी शक्यतो ओळीमध्ये करावी परंतु बियाणे फोकून करु नये त्यामुळे रोपवाटिकेमध्ये खुरपणी व्यवस्थित करता येत नाही.

रोपवाटिकेमध्ये विषाणूमुक्त रोपे कशी तयार करावी?
विषाणूमुक्त रोपे तयार करण्यासाठी सर्वप्रथम ज्या ठिकाणी रोपवाटिका करावयाची आहे तेथील जागा कार्बोफ्युरॉन ३ ते ५ ग्रॅम प्रती चौ.मी. या प्रमाणात औषधाची प्रक्रिया करावी. त्याचप्रामणे इमॅडोक्लीप्रिड २.५ ग्रॅम प्रती किलो या प्रमाणात बियाण्यास प्रक्रिया करावी. ज्या ठिकाणी रोपवाटिका तयार केली ती संपूर्ण रोपवाटिका नायलॉन नेटने झाकावी. रोपवाटिकेमध्ये रोपांची काळजी घ्यावी आणि १.५ मि.ली. मेटॅसिस्टॉक किंवा मोनोक्रोटोफॉस प्रती लीटर पाण्यात घेऊन ७ दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात. तसेच शेवटचा फवारा रोपे काढण्यापुर्वी दोन दिवस अगोदर द्यावा.

Exit mobile version