करडई लागवडीचे सुधारीत तंत्रज्ञान, असे घ्या जास्त उत्पादन

karadi

औरंगाबाद : करडईची लागवड रब्बी हंगामात केली जाते. करडई पिकासाठी मध्यम ते भारी, योग्य निचरा असणारी जमीन निवडावी. महाराष्ट्रात प्रामुख्याने मध्यम ते भारी काळ्या जमिनीवर करडई पीक घेतले जाते. हलक्या जमिनीवर सिंचन दिल्यास चांगले उत्पादन मिळते. करडईचे पीक सर्वसाधारणपणे १३० ते १३५ दिवसात तयार होते. सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास करडईचे जिरायतीमध्ये १० ते १२ क्विं/हे. आणि बागायती परिस्थितीत २० ते २५ क्विं./ हे. उत्पादन मिळू शकते.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने प्रसारित करडई लागवडीसाठी खालील अधिक अन्‍नेगीरी-१, एकेएस-३२७, एसएसएफ-७०८ या सारख्या अधिक उत्पादन देणार्‍या वाणांची सुध्दा लागवड केली जाते. करडईसाठी हेक्टरी १० ते १२ किलो बियाणे लागते. पेरणीचे अंतर दोन ओळीत ४५ सें.मी. व दोन रोपात २० सेें.मी. ठेवावे. पेरणीपूर्वी ३ ग्रॅम थायरम/बाविस्टीन प्रतिकिलो बियाणास चोळावे.

करडई पीक निखोळ किंवा आंतरपीक पद्धतीत घेता येते. पावसावर अवलंबून असणार्‍या भागात हरभरा करडई (६:२ किंवा ३:१), गहू करडई (३:१ किंवा २:१) व जवस करडई (३:१ किंवा ४:२) या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. हमखास पावसाच्या भागात मूग, उडीद, सोयाबीन नंतर करडईचे पीक घ्यावी. करडई पिकाची विरळणी करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा पीक सरळ वाढते, फांद्या कमी फुटतात व बोंडांची संख्या कमी होऊन उत्पादनात १५ ते ४० टक्क्यापर्यंत घट होते. उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी अतिरिक्‍त रोपे उपटून काढावीत व दोन रोपांतील अंतर २० सें.मी. ठेवावे.

करडई पिकावर मावा, तुडतुडे आणि उंटअळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. मावा किडीच्या नियंत्रणासाठी पेरणी वेळेवर करावी. या किडीचा प्रादुर्भाव दिसताच डायमिथोएट (०.०५ टक्के) फवारावे. करडईवरील मर रोगाच्या नियंत्रणासाठी पिकाची फेरपालट करावी, बियाणास बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. पानांवरील ठिपक्याच्या नियंत्रणासाठी मँकोझेब (०.२५ टक्के) रोग दिसताच फवारावे.

Exit mobile version