केळी उत्पादक शेतकर्‍यांना रोहयोअंतर्गंत आर्थिक मदतीचा हातभार

banana

जळगाव : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत आंबा कलम, आंबा रोपे, चिकू, पेरू, डाळिंब, मोसंबी, संत्रा, लिंबू आदी कलम व रोपे यांच्यासह यावर्षीपासून केळी पिकाचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे केळी पिकाची लागवड, रोपे खरेदी, मजुरी, सामुग्री करीता तिसर्‍या वर्षापर्यंत अनुदान शेतकर्‍यांना मिळणार आहे. याचा मोठा फायदा जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकर्‍यांना होणार आहे. कारण राज्यात केळी उत्पादन घेण्यात जळगाव जिल्हा आघाडीवर आहे.

केळीचा उत्पादन खर्च अधिक असताना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात दरवर्षी केळीचे लागवड क्षेत्र सातत्याने घटत होते. अलीकडेच शासनाने केळीला फळाचा दर्जा दिला असून केळीचा समावेश फळबाग योजनेत केला आहे. फळबाग योजनेसाठी रोजगार हमी योजनेचे मंजुरीचे दर वाढवून आता २५६ रूपये करण्यात आले आहेत.

या योजनेत शेतकरी शेतात, शेताच्या बांधावर फळबाग लागवड करू शकणार आहेत. फळबागाच्या प्रकारानुसार हेक्टर खर्च आणि दर निश्चित करणारे आदेश १० ऑगस्ट रोजी शासनाकडून काढण्यात आले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी आपल्या कार्यक्षेत्रातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधू शकतात.

Exit mobile version