अवघ्या दोन एकर पपई लागवडीतून लाखोंचे उत्पन्न!

papaya

औरंगाबाद : पारंपारिक पिकांना फाटा देत सध्या अनेक शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच काहीसा प्रयोग करत औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील थेरगाव येथील एका तरुण शेतकर्‍याने अवघ्या दोन एकर पपई लागवडीतून लाखोंचे उत्पन्न घेण्याची किमया केली आहे. अमोल कृष्णा ताकपीर असे या युवा शेतकर्‍याचे नाव आहे.

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये कापूस, सोयाबीन, मकासह सर्वच पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. अशात आता शेतकरी हतबल झाले आहे. मात्र अशा संकटकाळातही काही शेतकरी नवनवीन प्रयोग करुन मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेवून दाखवित आहेत. गतवर्षी औरंगाबादमधील काही जिल्ह्यांमध्ये पपईची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती. परंतू पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले. यामुळे यंदा फारशी कुणी लागवड केली नाही.

मात्र अमोलने दोन एकर शेतीमध्ये यंदा सात बाय सहावर पपईच्या दोन हजार झाडांची लागवड केली. आता या पिकातून त्याला पाच लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. बाजारात मागणी जास्त व उत्पादन कमी अशी परिस्थिती असल्याने यंदा पपईला विक्रमी भाव मिळेल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version