जळगाव : जिरेनियम शेतीबद्दल अनेकांनी ऐकले असेल. जिरेनियम शेतीतून लाखों रुपयांचे उत्पन्न मिळवता येते, अशी प्राथमिक माहिती अनेकांना असली तरी जिरेनियम शेती नेमकी कशी असते? त्यातून कसा नफा कमविता येतो, याची तंत्रशुध्द माहिती नसते. यामुळे आज आपण आज जिरेनियम शेतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यासोबत जळगाव जिल्ह्यातील सायगाव (ता.चाळीसगाव) येथील मंगेश महाले या तरुणाने जिरेनियम शेतीचा यशस्वी प्रयोग कसा केला? हे देखील जाणून घेणार आहोत.
जिरेनियम शेती म्हणजे नेमके काय?
जिरेनियम ही एक सुगंधी वनस्पती असून तिच्या पाल्यापासून तेल निर्मिती होते. या पिकाला कुठलाही जंगली प्राणी खात नाही. शिवाय त्यावर कुठल्याही रोग पडत नसल्याने रासायनिक औषधांची फवारणी करण्याची गरज नाही. एका एकरामध्ये १० हजार ते ११ हजार रोपांची लागवड करता येते. ही रोपे ३ किंवा ४ फूट दोन सरींमधील अंतर ठेवून तर १ ते दीड फूट रोपांमधील अंतर ठेवून करता येते. पाणी प्रमाणात देता यावे, यासाठी ठिबक सिंचनाचा वापर अनिवार्य आहे. एकदा लागवड केल्यानंतर ३ ते ५ वर्षे पीक येत राहते. एका एकरामध्ये एका वर्षात साधारणत: ४० टन बायोमास उत्पादनातून ३० ते ४० किलो तेल मिळते. एका वर्षात ३ ते ४ वेळा कापणीच्या हिशोबाने एका एकरात साधारणत: साडेतीन ते सव्वा चार लाखांपर्यंत उत्पन्न घेता येते.
एक टन पाल्यापासून १ किलो सुगंधी तेल
या रोपांची लागवड केल्यानंतर वर्षातून चार वेळा त्याचा पाला कापता येतो. एका कापणीत साधारणपणे १० ते १५ टन पाला निघतो आणि एक टन पाल्यापासून १ किलो सुगंधी तेल निघते. जिरेनियमच्या तेलाला भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर प्रचंड मागणी आहे. सौंदर्य प्रसाधने तयार करणार्या कंपन्यांसह पानमसाला उद्योग, साबण, अत्तर, सुगंधी उद्योग, सुगंधित उपचार आणि औषधी निर्माण कंपन्यांकडून हे तेल खरेदी केले जाते.
चाळीसगाव तालुक्यात यशस्वी प्रयोग
चाळीसगांव तालुक्यातील सायगाव येथील मंगेश महाले या तरुणाने आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न धावता, घरच्या अवघ्या चार एकर शेतात काही तरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात त्यांना जिरेनियम शेती व त्याचे फायदे यांची माहिती मिळाली. या विषयी संपूर्ण अभ्यास केल्यानंतर त्यांनी आपल्या शेतात जिरेनियमची लागवड करण्याचा निर्णय घेतला. जिरेनियमच्या लागवडीसंदर्भात जाणून घेतलेल्या माहितीनुसार त्यांनी पारंपरिक पद्धतीने सरळ पेरणी न करता, शेतात मातीचे बेड तयार करून माथ्यावर जिरेनियमची रोपे लावली. जेणेकरून या भागात पाऊस जास्त झाला तरी पाणी त्याच्या गुणधर्मानुसार या बेडवरुन निथरले जाईल.
लागवडीनंतर त्यांनी रासायनिक खतां ऐवजी जौविक खतांचा वापर केला. एका एकरात साधारणत: आठ ते दहा हजार रोपांची त्यांनी लागवड केली. ही रोपे चार चार फुटाच्या अंतरावर सरी पाडून केली. दोन रोपामधील अंतर हे दीड फूट ठेवले. या रोपांना प्रमाणात पाणी देता यावे, यासाठी त्यांनी ठिबकची व्यवस्था केली. जिरेनियमपासून तेल काढण्यासाठी मंगेश महाले यांच्याकडे साधने नसल्याने त्यांनी श्रीरामपूर येथे तेल काढले. यापुढे आपणच तेलाची देखील निर्मिती करायची या उद्देशाने त्यांनी तेल काढणीचे यंत्र शेतातच बसवले. आता ते मोठा नफा कमवित आहेत.