पशुखाद्याच्या किमतीत वाढ; जाणून घ्या काय आहे कारण

animal feed

औरंगाबाद : मागील पंधरा दिवसांत पशुखाद्याच्या किमतीत वाढ झाली आहे. विशेषतः सरकी पेंड, शेंगा पेंड, भुसा, तूरचुनी, कुळीथ आदी खाद्यांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. वाढत्या पशुखाद्यामुळे खर्चाचा ताळमेळ कसा बसवावा, असा प्रश्न दुग्ध उत्पादकांसमोर आहे.

अलीकडे शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाकडे कल वाढला आहे. त्यामुळे साहजिकच जनावरांची संख्या वाढली आहे. दरम्यान, अधिक उत्पादनासाठी जनावरांना पौष्टिक आहार दिला जातो. याकरिता विशेषतः सरकी पेंड, भुसा, शेंगा पेंड, तूरचुनी, हरभरा चुनी, मकाभरडा, कुळीथ आदी पशुखाद्याला प्राधान्य दिले जाते. मात्र, मागील काही दिवसांत पशुखाद्याच्या किमतीत भरमसाट वाढ झाल्याने पशुखाद्य खरेदी करणे पशुपालकांना कठीण झाले आहे. पोषक आहार म्हणून वापरली जाणारी सरकी पेंड व तुरीच्या चुनीचा दर वाढला आहे.

दुभत्या जनावरांच्या दुधावर अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, पशुखाद्याच्या वाढत्या दराने पशुपालकांच्या अर्थकारणावर परिणाम झाला आहे. जनावरांना समतोल आहार म्हणून मका, कोंडा, पॉलीश कोंडा, तांदूळ कणी आदींचाही वापर केला जातो. मात्र, कोंडादेखील मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे पशुपालकांना चढय़ादराने पशुखाद्य खरेदी करावे लागत आहे. 50 किलो सरकी पेंडचा दर 1300 रुपयांवरून 1500 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

पोषक वातावरणामुळे दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दूध उत्पादनात वाढ होते. यामुळे आता देखील वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्याच्या काळात दुधाच्या उत्पादनाच्या तुलनेत चार्‍याच्या किंमती भयंकर वाढल्या आहेत. गेल्या वर्षभरात पशूखाद्यामध्ये ५० ते ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या चाऱ्याचा किमती देखील वाढल्या आहेत. पशु खाद्याचे दर देखील तेजीत आहेत. या अति खर्चामुळे शेतकरी चिंतेत आहे. अनेक शेतकरी दुधाचे दर वाढवण्याची मागणी करत होते. शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आता दुधाचे भाव वाढण्याची दाट शक्यता आहे.

दुधाच्या दरात होणार वाढ

सध्या इंधन दर आणि विजेचे दर वाढल्यामुळे दूध उत्पादक संघाचा देखील खर्च वाढला आहे. हे कारण देत दूध संघांकडून दूध दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. महागाईमुळे शेतकरी आर्थिक खर्चात आणखी खचला आहे. लवकरच दुधाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचा देखील खर्च वाढला असल्याने दरात वाढ करण्याची मागणी होत आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version