संत्र्याच्या झाडांवर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत

orange-business-worth-rs-1500-crore-annually-in-maharashtra-alone

अमरावती – यंदाच्या कडक उन्हाचा परिणाम संत्रा बागांवरही होऊ लागला आहे. उष्णतेमुळे संत्र्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तापमानात वाढ झाल्याने संत्र्याची फळे पडू लागली आहेत. यासोबतच संत्र्याच्या झाडांवर काळी बुरशी नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. बदलत्या हवामानाचा परिणाम मोर्शी तालुक्यातील संत्रा बागांवर दिसू लागला आहे. रोगाच्या आक्रमणामुळे संत्र्याच्या झाडाची पाने पिवळी पडत असून झाडेही सुकत आहेत. या सर्वांवर उपाययोजना करूनही उपयोग होत नाही. त्यामुळे संत्रा उत्पादकांची चिंता वाढली आहे. संत्रा बागा वाचवण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या फळबागांचे कृषी तज्ज्ञ व कृषी विभागाकडे सर्वेक्षण करून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची मागणी करण्यात येत आहे.

मोर्शी तालुका संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र एकापाठोपाठ एक संकट आल्याने त्यांच्या कपाळावर चिंतेच्या रेषा उमटत आहेत. यंदा एप्रिल महिन्यापासूनच उष्णतेने आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली. मे महिन्यातही तापमान ४४ अंशांच्या पुढे गेल्याने झाडावरील संत्री गळायला लागली. मोर्शी तालुक्यातील संत्र्याच्या झाडांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय लिंबू विभाग फळ संशोधन संस्था आणि विभागीय स्तरावर कार्यरत अधिकारी व कृषी तज्ज्ञ यांच्याकडून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन विविध रोग व समस्यांवर काय उपाययोजना करता येतील, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. संत्रा फळ पडणे. याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. यासोबतच मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याची मागणी मोर्शी व वरुड येथील संत्रा उत्पादकांकडून होत आहे.

उन्हामुळे गळत आहेत फळे
मागील काही वर्षापासुन तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी कधी अवकाळी, गारपीट तर कधी व्यापाऱ्यांच्या पिळवणुकीला बळी पडत आहेत. यंदा पोषक वातावरण असल्यामुळे संत्रा बागा चांगल्या आल्या होत्या. परंतु मागील काही दिवसापासुन तापमानात कमालीची वाढ होत असल्याने, आंबिया बहराची फळे गळून पडत आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. राज्यात सर्वाधिक १ लाख ५० हेक्टर संत्रा फळ पिकांचे क्षेत्र हे विदर्भात असून, त्यात संग्रामपूर तालुक्यात २ हजार हेक्टरच्या वर संत्र्याच्या बागा आहेत. परंतु सतत बदलल्या हवामानाचा संत्रा फळ पिकांवर परिणाम होत आहे. मे महिन्यातील कडक उन्हाचा फटका संत्र्याच्या बगिच्याला बसला आहे. उन्हाच्या तीव्रतेने मोहर गळाला आहे. तसेच अती पानगळ झाल्याने संत्रा उत्पादकांना लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

नुकसानीचा सर्वे करण्याची मागणी
तापमान दिवसेंदिवस वाढतच असल्याने झाडावर असलेला मोहोर गळुन पडला आहे. तर काही मोहोर संत्रा झाडावरच काळा पडत आहे. पन्नास टक्क्यांच्यावर संत्र्याच्या बागा नष्ट झाल्याचे सांगीतले जात आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत. पीक विमा कंपनीकडून प्रिमीयममधे भरमसाठ वाढ केल्याने तालुक्यात ५० हेक्टर क्षेत्राचा पिक विमा शेतकन्यांनी काढला आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आता सरकारकडे नुकसानीचा सर्वे करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

Exit mobile version