पीकविमा योजनेबाबतची ही माहिती वाचाच… ही आहे मोदी सरकारची भूमिका

नवी दिल्ली : मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांना पीक संरक्षणाची हमी देत सुरू केलेल्या पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी सरकार अर्थसंकल्पात मात्र उदासीन दिसले. २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात पीकविमा योजनेत सुधारणा आणि योजनेला बळकटी देण्यासाठी मोठ्या तरतुदीची अपेक्षा होती. मात्र अर्थमंत्र्यांनी योजनेला बळकटी तर दूरच उलट गेल्या वर्षीच्या तुलनेत ५०० कोटींचा कमी निधी जाहीर केला.

२०२०-२१ च्या हंगामात पीकविमा योजनेसाठी केंद्र सरकारने १४ हजार १६१ कोटी रुपयांचा निधी दिला होता. तर २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात १६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली. मात्र सुधारित तरतुदीत केवळ १५ हजार ९८९ कोटी रुपये खर्च करण्यात आले. पुढील आर्थिक वर्षासाठी त्यात वाढ करणे अपेक्षित होते. मात्र २०२२-२३ साठी केवळ १५ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. २०२१-२२ मध्ये देशातील ६५ लाख शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला होता. या शेतकऱ्यांच्या ४२० लाख हेक्टरला विमाकवच मिळाले. तर स्मार्टफोनद्वारे ३० लाख पीक कापणी प्रयोग करण्यात आले, असे अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे.

हे देखील वाचा : केंद्राच्या योजनेचा राज्यातील ४१ लाख शेतकऱ्यांना फायदा, जाणून घ्या सविस्तर माहिती…

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणली. या योजनेसाठी २०२०-२१ मध्ये अर्थसंकल्पात ६० हजार ९९० कोटी रुपयांची तरतूद केली होती. तर २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात त्यात चार हजार कोटींची वाढ करून ६५ हजार कोटींवर नेण्यात आली. नंतर त्यात सुधारणा करून ६७ हजार ५५० कोटी रुपये करण्यात आली. म्हणजेच २०२०-२१ च्या तुलनेत योजनेत जवळपास साडेसहा हजार कोटींची वाढ झाली. आता २०२२-२३ या आर्थिक वर्षात योजनेसाठी मागील वर्षाच्या तुलनेत केवळ ५०० कोटींची वाढ करण्यात आली. पीएम-किसान योजनेत आत्तापर्यंत १२ लाख ६७ हजार ६७७ कोटी लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात म्हटले आहे.

शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई आणि नफा मिळावा, या दृष्टीने कमी प्रीमियममध्ये पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीसाठी अल्प प्रीमियमवर विमा संरक्षण दिले जाते. जर कोणत्याही आपत्तीमुळे तुमच्या पिकावर परिणाम झाला असेल, तर तुम्हाला नुकसान भरपाई दिली जाते. या योजनेअंतर्गत कोणताही भारतीयशेतकरी या विम्याचा लाभ घेऊ शकतो. किंवा जे शेतकरी अन्नधान्य पिके (तृणधान्ये, बाजरी आणि कडधान्ये), तेलबिया, वार्षिक व्यावसायिक/वार्षिक फलोत्पादन पिके घेतात, ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Exit mobile version