शेतजमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात फसवणूक टळणार; जाणून घ्या का?

farmer 1 1

पुणे : शेतजमिनीच्या किमती निश्चित करणे कठीण काम असते. यात बर्‍याचवेळा जमीन खरेदी करणार्‍याची किंवा विक्री करणार्‍याची फसवणूक होण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद या संस्थेने एस फार्म्स या कृषी ई-मार्केटप्लेस संस्थेच्या सहकार्याने शुक्रवारी देशातील पहिला शेतजमीन किंमत निर्देशांक बाजारात सादर केला. या निर्देशांकामुळे शेतजमिनीच्या खरेदी-विक्रीत पारदर्शकता येणार आहे.

शेतजमीन व कृषी संबंधित व्यवसायांमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर रस घेताना दिसत आहेत. कृषी अभियांत्रिकी, आधुनिक शेती, अन्न तंत्रज्ञान, पुरवठा साखळी व्यवस्थापन तसेच हरित ऊर्जा असा विविध विषयांकडे लोकांचा ओढा वाढत चालला आहे. यामुळे शेतीसाठी, त्यातही शेतजमिनीसाठी अशा निर्देशांकाची आवश्यकता होती.

शेतजमीन किंमत निर्देशांकाची रचना देशातील शेतजमिनींच्या गुणवत्तेनुसार तिची किंमत नोंदवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या निर्देशांकाची निर्मिती आयआयएम-ए येथील दि मिश्रा सेंटर फॉर फायनान्शियल मार्केट्स अ‍ॅण्ड इकॉनॉमी या केंद्रामध्ये झाली आहे. या निर्देशांकाविषयीची माहिती या सेंटरच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार असून या निर्देशांकाचे नाव आयआयएम-अहमदाबाद एसफार्म्स इंडिया लॅण्ड प्राइस इंडेक्स (इसाल्पी)असे ठेवण्यात आले आहे.

सध्या इसाल्पी अंतर्गत देशातील सहा राज्यांतील शेतजममिनीचा समावेश केला गेला आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू, तेलंगण व उत्तर प्रदेश या राज्यांतील शेतजमिनीची माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. हळूहळू अन् राज्यांतील जमिनीची माहितीही समाविष्ट केली जाणार आहे.

Exit mobile version