‘या’ कारणांमुळे मोहरीचे पीक रब्बी हंगामात घेणे फायद्याचे

mohari

नगर : मोहरी हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक असून ते कमी खर्चात जास्त फायद्याचे आहे. महाराष्ट्रात गहू, हरभरा, यांसारख्या रब्बी पिकात हे आंतरपीक किंवा मिश्रपिक म्हणून घेतात. तथापि मोहरीचे सलग पीक घेणे हे सुद्धा फायद्याचे आहे. मोहरीच्या सुधारीत वाणाचा वापर, योग्य खतांची मात्रा, पीक संरक्षण व वेळेवर काढणी या बाबींचा योग्य रितीने वापर केल्यास कोरडवाहू पिकापासून हेक्टरी ८ ते १० क्विंटल व बागायतीपासून १२ ते १५ क्विंटल उत्पादन निश्‍चित मिळू शकते. मोहरीची उत्पादन क्षमता, तेलबियांचे बाजारभाव आणि कमी उत्पादन खर्च या बाबींचा विचार केल्यास मोहरीचे पीक रब्बी हंगामात घेणे फायद्याचे आहे.

मोहरी लागवडीसाठी मध्यम ते खोल, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. मध्यम, खारट जमिनीत इतर पिकांच्या तुलनेत मोहरी पीक चांगले येते. पाणथळ व दलदलयुक्‍त जमीन या पिकास हानिकारक असते. योग्य वाणाची निवड करून साधारणत: ४ ते ५ किलो बियाणे/हेक्टरी वापरावे. पेरणीपूर्वी १ ग्रॅम बाविस्टीन प्रति किलो बियाणास कोरडे चोळून बीजप्रक्रिया करावी. पेरणीचे अंतर भारी जमिनीत दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. तर मध्यम जमिनीत ३० सें.मी. ठेवावे. बियाणे फार खोलवर पडणार नाही, याची काळजी घ्यावी.

मोहरीच्या बागायती पिकासाठी हेक्टरी ५० किलो नत्र व २५ किलो स्फुरद द्यावे. नत्राची निम्मे मात्रा (२५ किलो) व संपूर्ण स्फुरद (२५) किलो पेरणीच्या वेळी व अर्धे नत्र (२५ किलो) पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी द्यावे. कोरडवाहू पिकासाठी ४० किलो नत्र व २० किलो स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे. मोहरी हे आंतर पीक म्हणून घेणे फायदेशीर आहे. मोहरीवरील आंतरपीक प्रयोगात गहू+मोहरी (४:२) पट्टा पद्धतीनेूघेतल्यास जास्त फायद्याचे आढळून आले. तसेच या प्रयोगात असे निदर्शनास आले की, गहू+मोहरीच्या पट्टा पद्धतीमुळे निव्वळ गहू व मोहरी स्वतंत्र पिकाच्या तुलनेत अधिक आर्थिक फायदा मिळतो. जर मिश्र पीक म्हणून घ्यावयाचे असेल तर गहू+मोहरी ओळीचे प्रमाण ४:२ किंवा ६:२ असे ठेवावे.

मोहरी पिकावर प्रामुख्याने करपा, पांढरा तांबेरा व भुरी या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.पांढरा तांबेरा व करपा हा रोग शेंगा लागण्याच्या वेळी येतात. त्यासाठी मँकोझेब १२५० ग्रॅम ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे. तर भुरी या रोगाच्या नियंत्रणासाठी ०.२५ टक्के गंधकाची फवारणी करावी. मोहरीवर माशी व मावा या दोन किडींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येतो. माशी या किडीचा प्रादुर्भाव पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यात दिसून येतो. यासाठी मॅलॅथिऑन ५० ई.सी. ६२५ ते १००० मि.ली. किंवा डायमिथोएट ३० टक्के प्रवाही ५०० मि.ली. ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. मावा या किडीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट ३० टक्के प्रवाही ५०० मि.ली. किंवा क्लोरोपायरिफॉस २० टक्के प्रवाही ५०० मि.ली. ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे.

Exit mobile version