कोट्याधीश उद्योगपती बैलपोळ्याला बैल फिरवतात तेंव्हा…वाचा सविस्तर

Jains

जळगाव : सुक्ष्मसिंचनसह कृषी क्षेत्रात जैन उद्योग समुह ही जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीचा विस्तार ३० पेक्षा जास्त देशांमध्ये आहे. या उद्योग समुहातर्फे जैन हिल्सवरील कृषी संशोधन विकास केंद्रावर बैल पोळा हा यंदाही सालाबादाप्रमाणे उत्साहात साजरा करण्यात आला. जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी स्वत: ऋषभराज नावाच्या बैलाची दोरी हातात घेवून त्यास फिरवले. यावेळी विदेशी मान्यवरांसह अनेक जण उपस्थित होते.

जैन कृषि संशोधन केंद्राच्या ध्यानमंदिरापासून मिरवणूकीस सुरवात झाली. श्रद्धाज्योत या श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या समाधीस्थळी बैलांच्या मिरवणूकीने प्रदक्षिणा घातली व वंदन केले. त्यानंतर श्रद्धाधाम, सरस्वती पॉईंट मार्ग सवाद्य मिरवणू्क काढण्यात आली होती. मुख्य सोहळा जैन हिल्स हेली पॅड येथील मैदानावर झाला. यावेळी व्यासपीठावर अणूशास्त्रज्ञ व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, डॉ. भालचंद्र नेमाडे, महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, राजा मयूर, डॉ. सुभाष चौधरी, डॉ. सुदर्शन अय्यंगार, डॉ. एम. पी. मथाई, डॅनियल हदाद (इस्त्राईल) यांच्यासह जैन परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.

अशोक जैन यांनी पोळा फोडण्याच्या सोहळ्यासाठी हिरवी झेंडी दाखविली. सालदार अविनाश गोपाल यांनी पोळा फोडण्याचा मान मिळविला. ज्योती जैन यांच्यासह जैन परिवारातील सर्व सदस्यांनी बैलांचे विधीवत पूजन करून त्यांना गोड घास भरविला. जैन परिवारातील सर्वात लहान सदस्य अर्थम अथांग जैन याच्याहस्ते सुद्धा घास भरविण्यात आला. भव्य अशा व्यासपीठावर सप्तधान्याची रास, शेती उपयोगी अवजारांचे पूजन अशोक जैन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले.

भूमिपुत्रांचा सत्कार
जैन कृषि संशोधन विकास केंद्रातील विविध ठिकाणांवर २५ च्यावर बैल जोड्या आहेत. त्यांच्यासाठी ३५ च्यावर सालदार गडी शेती-मातीत राबत असतात. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत व जैन परिवाराच्या हस्ते सर्व सालदारांचा परिवारासह सत्कार व संसारोपयोगी साहित्य भेट सन्मानाने देऊन गौरव करण्यात आला. भारतीय संस्कृती, कृषी सांस्कृतिक वैभवाचा जैन हिल्स परिसरात मला अनुभव आला. प्रत्यक्ष सहभाग घेता आल्याने मी स्वत: ला भाग्यवान समजतो, अशी प्रतिक्रिया डॅनियल हदाद यांनी दिली.

ऋषभराजाला ऊर्जास्वरूपात आजही शेतीमध्ये स्थान आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, शेतीमध्ये ऋषभराजाला अनन्य साधारण महत्त्व त्याचमुळे प्राप्त झालेले आहे. पोळ्याच्या दिवशी ऋषभराजाचे पूजन त्याच्या कष्टाप्रती केलेला सन्मानच ठरतो अशी भावना डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली. डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी भवरलालजी जैन यांची आठवण काढत पोळा सणात लोकसंस्कृती जोडली याचे नाविन्य जपत त्यांनाही महत्त्वाचे स्थान देण्याचे सुरू केले ही कृषी संस्कृती पुढच्या पिढीनेही जपली आहे याचा आनंद आहे. पोळा हा सण कान्हदेशात सांस्कृतिक मूल्य जोपासणारा ठरलेला आहे असेही ते म्हणाले. सण-उत्सव वर्षभर येत असतात मात्र बळिराजा आणि त्याच्यासोबत राबणार्‍या सर्जा-राजाचा कृतज्ञता व्यक्त करणारा सण पोळा बंधूभाव जोपासणारा वाटतो. गत २५ वर्षापासून हा सण जैन हिल्सला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यावर्षी सर्वांनी हिरीरीने सहभाग घेतला याचा आनंद असल्याचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन म्हणाले.

Exit mobile version