पिकांसह भाजीपाल्यावरही करपा रोगाचा प्रादुर्भाव, अशी घ्या काळजी…

Karpa disease-on-vegetables

मुंबई : रब्बीतील गहू, हरभरा, ज्वारी या मुख्य पिकांची उगवण होताच ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्याचे वातावरण हे पिक वाढीसाठी नाही पिकांवर अळी वाढण्यासाठी पोषक आहे.  हऱभरा या पिकावर घाटीअळीचा, ज्वारी व मका या पिकांवर लष्करी अळी तर  गहू या पिकावर तांबोरा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रब्बी पिकांपाठोपाठ आता भाजीपाल्यावरही याचा परिणाम जाणवू लागला आहे. बटाटा, टोमॅटोसह भाजीपाल्यांवरही करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढतांना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर पिकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन भारतीय कृषी संशोधन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

बटाटा आणि टोमॅटोमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे भाजीपाल्याची मुळे मजबूत करण्यासाठी त्याला मातीचे अच्छादन करणे आवश्यक आहे. त्यामुळे पिकाचे संरक्षण होणार आहे.

असे करा भाजीपाल्याचे व्यवस्थापन

बटाटा आणि टोमॅटोमध्ये करपा रोगाचे प्रमाण वाढत आहे. सध्याच्या वातावरणातील बदलामुळे रोगांचा प्रादुर्भाव होत असून करपा रोगाची लक्षणे दिसताच ४५ लिटर पाण्यामध्ये १ ग्रॅम डिथेन किंवा २ ग्रॅम एम याचे मिश्रण करुन फवारणी करावी लागणार आहे. तर नर्सरीमध्ये टोमॅटो, फुलकोबी, कोबी आणि ब्रोकोली याची लागवड करायची असेल तर वातावरणाचा अंदाज घेऊनच करावी लागणार आहे. वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण वाढत असल्याने या करप्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मध्यंतरी फळबागावर तर आता भाजीपाल्यावर हा रोग वाढत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याचा धोका आहेच पण योग्य व्यवस्थापन केले तरच भाजीपाल्यातून उत्पन्न मिळणार आहे.

सध्याच्या वातावरणात कोबीच्या भाज्यांमध्ये पान खाणार्‍या कीटकांचे प्रमाण वाढते. त्यामुळे सातत्याने त्यावर लक्ष असणे गरजेचे आहे. जर अळीचा प्रादुर्भाव वाढला तर मात्र १० ग्रॅम बीटी १ लिटर पाण्यात किंवा १ मिली पेनसयुक्त औषध हे ३ लिटर पाणी मिसळा आणि फवारणी करावी लागणार आहे.

असे करा पिकांवरील अळींचे नियंत्रण

हरभरा पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे पण या पिकावर घाटी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी ५ टक्के निंबोळी अर्क, एकरी २ कामगंध सापळे व २० पक्षा थांबे बसवावे लागणार आहेत. शिवाय अळीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात असल्यास इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के ४ ग्रॅम क्विनॅालफास हे १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे गरजेचे आहे.

मका व ज्वारीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. या अळीच्या नियंत्रणासाठी सुरवातीच्या अवस्थेत ५ टक्के निंबोळी अर्क, इमामेक्टीन बेंझोएट ४ ग्रॅम व ५ मिली लॅम्बडा सायहॅालोथ्रीन ९.५ झेड सी किंवा स्पिनेटोरम ४ मिली हे १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लागणार आहे.

फवारणी करताना ही घ्या काळजी

फवारणी करण्यापूर्वी शेतकर्‍यांनी कृषी सहायकांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. अन्यथा महागडी औषधे खरेदी करुनही उपयोग होणार नाही. शिवाय प्रत्यक्ष पीक पाहणी करुन शेतकर्‍यांना योग्य ते मार्गदर्शन करता येते त्यामुळे शेतकर्‍यांनी कृषी सहायकांच्या संपर्कात असणे आवश्यक आहे. शिवाय ५० टक्के अनुदानावर किटकनाशकांची मागणी कृषी कार्यालयांनी केली असून त्याचा देखील लाभ शेतकर्‍यांना होणार आहे.

Exit mobile version