अकोला : देशात तेलबियांची मागणी वाढत असल्याने शेतकरी सूर्यफूल लागवडीकडे वळत आहे. रब्बी हंगामात ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यात सूर्यफुलाच्या लागवडीसाठी सर्वोत्तम वेळी मानली जाते. काही शेतकरी उशिराही सूर्यफुलाची लागवड करतात. उन्हाळी हंगामासाठी जानेवारीचा शेवटचा ते फेब्रुवारीचा पहिला पंधरवाडा हा काळ योग्य मानला जातो. सर्वसाधारणपणे सुधारित लागवड तंत्राचा वापर केल्यास सुधारित वाणाचे १० ते १२ किंटल हेक्टरी उत्पादन मिळू शकते व संकरित वाणाचे १२ ते १५ किंटल उत्पादन मिळू शकते.
सूर्यफुलाच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. शेवटच्या वखरणीपूर्वी हेक्टरी ५ ते १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कम्पोस्ट खत किंवा गांडूळखत २.५ टन जमिनीत मिसळून द्यावे. सरत्याने/ट्रॅक्टरने पेरणीकरिता- ८ ते १० कि.ग्रॅ./हेक्टर, टोकन पद्धतीने पेरणीकरिता : ५ ते ६ कि.ग्रॅ./हेक्टर बियाण्या वापरण्याचा सल्ला तज्ञांकडून देण्यात आला आहे. पेरणीच्या वेळी शेतातच प्रति कि.ग्रॅ. ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा व्हीरीडी हे बुरशीनाशक बियाण्यास चोळावे. पेरणीपूर्वी इमिडयाक्लोप्रीड ७० डब्लू एस ५ ग्रॅम प्रति कि.ग्रॅ. बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
दोन ओळीतील अंतर ६० सें.मी. तर दोन झाडातील अंतर ३० सें.मी. ठेवून टोकण पद्धतीने पेरणी करावी. पेरणीसाठी संकरित वाणाचे ५ ते ६ कि.ग्रॅ. बियाणे वापरावे. दोन ओळीतील अंतर ७५ सें.मी. व दोन झाडातील अंतर २५ सें.मी. करून पेरणी फायदेशिर ठरते. या पिकामध्ये विरळणीला फार महत्त्व आहे. पेरणीनंतर १० ते १५ दिवसांनी एका ठिकाणी एक असे निरोगी व तंदुरुस्त झाड ठेवून विरळणी करावी. योग्य विरळणी केल्यास १८ ते २३ टक्के उत्पादनात वाढ होऊ शकते.
या पिकास संकरित वाणांसाठी ८०:६०:३० कि.ग्रॅ. नत्र, स्फुरद, व पालाशची शिफारस केली आहे. शिफारस केलेल्या मात्रेपैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्यावेळी व उर्वरित अर्धे नत्र पेरणीपासून ३० ते ३५ दिवसांनी म्हणजेच कळी अवस्थेत द्यावे. या पिकास दोन डवरणी व आवश्यकतेनुसार एक निंदन करून पीक ४५ दिवसाचे होईपर्यंत तण विरहित ठेवावे. तसेच रासायनिक तण नियंत्रणासाठी पेंडेमेथ्यालीन (३८.७ टक्के सी एम) ०.७५ कि.ग्रॅ. क्रियाशील घटक प्रति हेक्टर या प्रमाणात उगवणपूर्व फवारावे. तसेच प्रोप्याक्वीझ्यालोफोपस (१०टक्के इसी) ६२ ग्रॅम क्रियाशील घटक या प्रमाणात उगवणीनंतर १५ ते २० दिवसांनी फवारावे.