शेतमाल कमी पैशात बाजारपेठेत पोहचविण्यासाठी ‘या’ सुविधेबद्दल माहित आहे का?

healthy vegetables

नाशिक : शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकारतर्फे किसान रेल योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून कृषी उत्पादने, विशेषत: नाशवंत उत्पादने, स्वस्त दरात, इतर राज्यांमध्ये वाहतूक करण्यासाठी वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. किसान रेल सार्वजनिक-खासगी भागीदारी मॉडेलवर चालविली जात आहे. किसान रेलच्या माध्यमातून मालाच्या वाहतुकीवर ५० टक्क्यांपर्यंत सबसिडीही दिली जाते. किसान रेलच्या माध्यमातून छोट्या शेतकर्‍यांनाही मोठी बाजारपेठ दिली जात आहे. पूर्वी किसान रेल साप्ताहिक होती, मात्र आता ही रेल्वे आठवड्यातून तीन दिवस चालवली जात आहे.

अन्न प्रक्रिया आणि उद्योग मंत्रालयाच्या वतीने, किसान रेलद्वारे फळे आणि भाजीपाला वाहतुकीसाठी भाड्यावर आकारण्यात येणार्‍या शुल्कावर ५० टक्के सबसिडी दिली जाते. शेतकर्‍यांना ही अनुदानाची रक्कम तात्काळ मिळते, त्यामुळे पीक वाहतुकीचा खर्च निम्मा होतो. अहवालानुसार, जर रस्त्याने वाहतूक खर्च ७-८ रुपये प्रति किलो असेल, तर किसान ट्रेनद्वारे हा खर्च केवळ २.८२ रुपये होतो. रस्त्याच्या तुलनेत त्याचे भाडे खूपच कमी आहे, त्यामुळे शेतकर्‍यांना आपला माल इतर ठिकाणी सहजपणे नेण्याची संधी मिळत आहे.

किसान रेल मध्ये कोल्ड स्टोरेज सुविधा
किसान रेलमध्ये कोल्ड स्टोरेजची सुविधा उपलब्ध आहे, ज्यामुळे फळे, भाजीपाला, मासे आणि इतर अशा नाशवंत कृषी उत्पादनांची गुणवत्ता राखली जाते, ती खराब होत नाहीत. ते योग्य वेळी मंडईत पोहोचतात आणि त्यांना रास्त भाव मिळतो.भाज्यांमध्ये शिमला मिरची, केळी, बटाटा, टोमॅटो, मिरची, आले, लसूण, कांदा, फ्लॉवर, किवी पाठवू शकता, तर फळांमध्ये संत्री, सफरचंद, खरबूज, पेरू, पपई, डाळिंब, द्राक्षे पाठवू शकता. याशिवाय शेतकरी फुले, दुग्धजन्य पदार्थ, अंडी आणि मासे इतर ठिकाणी रेल्वेने पाठवू शकतात.

Exit mobile version