केळी उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबविण्यासाठी कृषीमंत्र्यांना पत्र

mla-chimanrao-patil

आमदार चिमणराव पाटील

जळगाव : संपूर्ण देशात केळी उत्पादनात जळगाव जिल्ह्याचे नाव अग्रेसर आहे. येथील केळीला अन्य राज्यांसह परदेशातही मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र गत काही वर्षांपासून संपूर्ण खान्देशातील केळी उत्पादक शेतकरी अडचणी आला आहे. त्यात आता व्यापार्‍यांकडून लूट वाढली आहे. केळी बोर्डावरील भाव आणि खरेदी यात मोठी तफावत आढळून येते. बोर्डावर ८०० ते १००० रुपयांचा भाव असतांना केवळ २०० ते ३०० रुपयांनी खरेदी केली जाते. याबाबत शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी थेट कृषीमंत्री दादाजी भुसे यांना पत्र लिहून लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनात अग्रेसर असून जिल्यातील प्रमुख पिक केळी आहे. केळी उत्पादन खर्च खूप मोठा असतो. रावेर बोर्डाकडून खरेदीचे दर जारी केले जातात मात्र रावेर बोर्डाचे दर मान्य न करता व्यापारी २०० ते ३०० प्रति क्विंटल भावाने खरेदी करतात. तोच केळीचा माल किरकोळ विक्रेते २५-३० रुपये डझन दराने विक्री करीत आहेत. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देणे कामी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे, पणनमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे कडे पत्रान्वये केली आहे. केळी उत्पादक शेतकरी व व्यापारी यांची तातडीची बैठक बोलविण्यात यावी, अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली आहे.

Exit mobile version