नांदेड : पर्यावरणाची हानी कमी करून नत्राची कार्यक्षमता वाढवण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे नॅनो युरिया होय. नॅनो युरिया हा वापरण्यास सोपा आणि शेतकरी, वनस्पती, प्राणी आणि वातावरणास सुरक्षित आहे. नॅनो युरियाचा सर्व प्रकारच्या पिकांना नत्राचा स्रोत म्हणून वापर केला जाऊ शकतो. नॅनो युरिया हा विषारी नाही. नॅनो युरियाचे कण सहजरीत्या पानांच्या पर्णरंध्रे मार्फत शोषले जातात आणि ते पानांच्या पेशीमधील पोकळीमध्ये साठवले जातात. त्यानंतर हे नॅनो कण पिकाच्या गरजेनुसार नायट्रेट किंवा अमोनिकल आयनमध्ये रूपांतरित होऊन पिकांना उपलब्ध होतात. या नॅनो युरिया कणांचे पिकाच्या अन्ननलिकेमधून जिथे गरज आहे तिथे वाहन केले जाते. न वापरलेले नॅनो युरियाचे कण हे पेशीतील पोकळीमध्येच साठवले जातात आणि ते पुन्हा पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये गरजेनुसार सावकाश वापरले जातात.
नॅनो युरिया चे फायदे :
१) नॅनो युरियाची एक बाटली (५०० मि.ली.) आणि एका युरियाच्या गोणी (४५ किलो) यांची कार्यक्षमता समान आहे. त्यामुळे पारंपरिक युरिया
खतांवरील शेतकर्यांचे अवलंबित्व कमी होते.
२) नॅनो युरियाच्या वापरामुळे पिकांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होते, खर्चात बचत होते आणि पर्यायाने शेतकर्यांच्या एकूण उत्पन्नात वाढ होते.
३) पिकांची पौष्टिकता आणि गुणवत्ता सुधारते.
४) नॅनो युरियाच्या वापरामुळे हवा, पाणी आणि जमीन यांची हानी थांबते.
नॅनो युरिया वापरण्याचे प्रमाण आणि पद्धत :
१) पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार २ ते ४ मि.ली. नॅनो युरिया प्रति लीटर पाण्यामध्ये मिसळून पिकाच्या प्रमुख वाढीच्या अवस्थेनुसार फवारणी करावी.
२) उत्तम परिणामांसाठी दोन वेळा फवारणी करावी – पहिली फवारणी पिकाच्या फुटवे फुटण्याच्या अवस्थेमध्ये (पिकाची उगवण झाल्यावर ३० ते ३५ दिवसांनी) आणि दुसरी फवारणी पिकाला फुलकळी निघण्याच्या ७ ते १० दिवस अगोदर करावी.
३) पाने पूर्ण ओली होण्यासाठी आणि नॅनो युरिया समप्रमाणात सर्वत्र मिळण्यासाठी पंपाला फ्लॅट फॅन किंवा कट नोझल लावून फवारणी करावी.
४) फवारणी सकाळच्या वेळेत कमी उन्हामध्ये आणि हवेच्या कमी वेगामध्ये करावी.