राज्यातील ४२ लाखांपेक्षा जास्त शेतकर्‍यांचे नुकसान कसे झाले? वाचा सविस्तर

sad indian farmer 1

मुंबई : यंंदाच्या खरिप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उरली सुरली कसर परतीच्या पावसाने भरुन काढली आहे. गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे अतिवृष्टी, ढगफुटी, पूर, शेतात पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असून, आतापर्यंत ४२ ते ४५ लाख शेतकर्‍यांना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. विमा भपाईसाठी ४१.६३ लाख शेतकर्‍यांनी विमा कंपन्याकडे दावे दाखल केले आहेत.

राज्यात जुलै-सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीला मोठा फटका बसला असून, पूर, अतिवृष्टीमुळे २३ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले. राज्य सरकारने यंदा शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या मदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार जिरायती पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ६००, बागायतीसाठी २७ हजार आणि बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी ३६ हजार याप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत देण्यात येत आहे. त्यानुसार यापूर्वी अतिवृष्टी, पुराचा फटका बसलेल्या शेतकर्‍यांना आतापर्यंत चार हजार ६९१ कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे.

एकीकडे शेतकर्‍यांना मदतीचे वाटप सुरू असताना गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणी कोसळलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात गेल्या आठ-पंधरा दिवसांत झालेल्या पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. उभी पिके नष्ट झाली आहेत. राज्यात सततच्या पावसाने शेतकर्‍यांची खरीप व रब्बी हंगामातील पिके वाया गेली आहेत. अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून अडचणीतील शेतकर्‍यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी केली.

Exit mobile version